पुणे – शहराच्या वाढत्या नागरीकरणामुळे भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी महापालिकेकडून हाती घेण्यात आलेले महत्त्वाकांक्षी प्रकल्प तातडीने मार्गी लावून शहर समस्यामुक्त करण्यावर आपला भर राहणार असल्याचे महापालिकेचे नवनियुक्त सभागृहनेते गणेश बीडकर यांनी स्पष्ट केले.
बीडकर यांना भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी महापालिकेत शुक्रवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी ते बोलत होते. दरम्यान, मावळते सभागृह नेते धीरज घाटे यांच्याकडे शहर प्रभारीपदाची जबाबदारी दिली असून त्याबाबतचे पत्रही यावेळी घाटे यांना देण्यात आले. महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्यासह भाजपचे नगरसेवक यावेळी उपस्थित होते.
बीडकर म्हणाले, गेले आठ महिने करोनामुळे महापालिकेचा विकास ठप्प झाला आहे. ही विकासकामे तातडीने मार्गी लावण्यावर आपला भर राहणार असून पक्षाने आपल्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविणार आहे. त्याचसोबत महापालिका निवडणुकीत भाजपने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे.
पुणेकरांसाठी पुढील 50 वर्षांचे व्हिजन ठेवून जायका, समान पाणीपुरवठा योजना यासारख्या सर्व महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करणे आणि शहर समस्यामुक्त करण्यावर आपला भर राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महापौरांनीही दिले नियुक्तीचे पत्र
शुक्रवारी एकाच दिवसात बीडकर यांच्या नियुक्तीचे पत्र महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बीडकर यांना दिले. पक्षाने त्यांची नियुक्ती केल्यानंतर त्याबाबतचे पत्र पक्षाकडून विभागीय आयुक्तांना देण्यात आले होते. त्यानुसार, विभागीय आयुक्तांनी त्यांच्या सभागृहनेतेपदी नियुक्तीस मान्यता दिली असून त्या पत्रानंतरही महापौरांनीही त्यांना सायंकाळी नियुक्तीचे पत्र दिले आहे. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने उपस्थित होते.