खासदार सुळे : पुणे विभागीय अधिकारी शर्मा यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन सुपूर्त
बारामती- बारामती रेल्वे स्थानकाची इमारत जुनी झाली असून तेथे नवीन इमारत उभारावी, सेवा रस्त्याच्या प्रस्तावास मंजूरी द्यावी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी यासह इतर मागण्यांसोबतच रेल्वे स्थानकांतील समस्या त्वरीत सोडवा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेच्या पुणे विभागीय अधिकारी रेणू शर्मा यांच्याकडे करून गुरुवारी (दि. 19) त्यांना निवेदन दिले.
बारामती रेल्वे स्थानकातील विविध विषयासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी शर्मा यांची पुणे येथील कार्यालय भेट घेतली. तसेच रेल्वे स्थानकातील विविध समस्यांविषयी चर्चा केली. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, गटनेते सचिन सातव, नगरसेवक सत्यव्रत काळे, राष्ट्रवादीचे बारामती शहर उपाध्यक्ष सिद्धनाथ भोकरे, तसेच सुप्रिया सुळे यांचे समन्वयक प्रवीण शिंदे आधी यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, खासदार सुळे यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोदकुमार यादव यांची भेट घेतल्यानंतर रेणू शर्मा यांनी बारामती रेल्वेस्थानकाची तातडीने पाहणी केली होती. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी देखील रेल्वे स्थानकाला भेट देत समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर गुरुवारी रेल्वेच्या पुणे येथील कार्यालयात शर्मा यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनात नमूद केले आहे की, गुल पूनावाला व सायरसवाला उद्यानात शौचालयासाठी जागा देण्यात यावी. संविधान स्तंभ उभारण्यात यावा. माथाडी कामगारांसाठी शौचालय बांधण्यासाठी जागा देण्यात यावी, अशा विविध मागण्यांचा त्यात समावेश आहे.
- खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वाखाली बारामतीतील शिष्टमंडाळाने रेल्वेच्या पुणे विभागीय अधिकारी रेणू शर्मा यांची भेट घेत बारामती रेल्वे स्थानकातील विविध समस्यांवर त्वरीत तोडगा काढण्याची मागणी केली असून रेल्वे विभागही याबाबत सकारत्मक असून लवकरच या अडचणी सुटतील अशी आशा आहे.
– सचिन सातव, गटनेते, बारामती नगर परिषद