सौरऊर्जेमुळे विजेचे अर्थकारण बदलणार

चंद्रकांत पाटील ः गडहिंग्लज येथे महावितरणच्या 2.42 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण

कोल्हापूर (प्रतिनिधी) – शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त वीज द्यायची असेल तर सौर ऊर्जेशिवाय पर्याय नाही. जगाच्या तुलनेत भारतात तिन्ही ऋतू समान कालावधीचे आहेत. सौर ऊर्जा मुबलक असून ती फुकट आहे. या सौर ऊर्जेतून वीजनिर्मिती केल्यास शेतीला व उद्योगाला स्वस्तात वीज मिळेल. हजारो कोटींचे शासन अनुदान वाचून विजेचे अर्थकारणच बदलेल, असे प्रतिपादन राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाम तथा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

गडहिंग्लज येथे महावितरणच्या 2.42 मेगावॅट सौर प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.महाराष्ट्र शासनाने “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेतंर्गत महावितरणच्या मोकळ्या जागेत सौर ऊर्जेद्वारे वीज निर्मिती करण्यासाठी केंद्र शासनाच्या ईईएसएल कंपनीसोबत 200 मेगावॅट वीज खरेदीचा करार केला आहे. त्यातून गडहिंग्लज तालुक्‍यात गडहिंग्लज व हलकर्णी तर चंदगड तालुक्‍यातील शिनोली येथे अनुक्रमे 1 मेगावॅट, 0.7 व 0.5 मेगावॅट क्षमतेचे लघु सौर ऊर्जा प्रकल्प साकारले आहेत. याचा लाभ 500 शेतकऱ्यांना होणार आहे.

कोल्हापूर परिमंडलातील हा पहिला सौर प्रकल्प आहे. या तिन्ही प्रकल्पाचे लोकार्पण शुक्रवारी सकाळी 11 वाजता गडहिंग्लज येथील महावितरण विभागीय कार्यालय परिसरात झाले. यावेळी म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंहराजे घाटगे, आमदार संध्यादेवी कुपेकर, हसन मुश्रीफ यांची उपस्थिती होती.

चंद्रकांत पाटील म्हणाले, कोळशाची उपलब्धता दिवसेंदिवस कमी होत असल्याने पारंपारिक विजेवरचे अवलंबित्वही कमी करावे लागणार आहे. जलविद्युत निर्मितीलाही मर्यादा आहेत. त्यात अपारंपरिकमध्ये सौरऊर्जा मुबलक व 365 दिवस उपलब्ध आहे. सौर ऊर्जेत एकदाच गुंतवणूक आहे. ही गुंतवणूक वाढविल्यास राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आगामी दोन वर्षांत सौरऊर्जेवर वळविता येईल. उद्योगांनीही त्यांना लागणारी वीज स्वत: तयार केली तर विजेचे अर्थकारण बदलेल, असा विश्वास व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)