पिंपरी – दिवसेंदिवस विजेची वाढती मागणी व त्यातून निर्माण होणारा तुटवडा लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने पुणे विभागातील रेल्वे स्थानकांची विजेची गरज सौरऊर्जेने पूर्ण करण्याचा निश्चय केला आहे. त्यासाठीची पाहणीही सुरु करण्यात आली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. पिंपरी रेल्वे स्थानकाला दरमहा 27 हजाराहून अधिक वीज बिल येते. सौरऊर्जेचा पर्याय निवडल्यास मोठी बचत होणार आहे.
पुणे स्टेशन येथे 2015 सालापासूनच सौरऊर्जेचा वापर सुरु केला. यामुळे येथील वीज बिलात वर्षाला 22 लाखांची बचत होत आहे. पुणे रेल्वे स्थानकावर सौर ऊर्जेचा प्रकल्प 2015 सालीच उभारण्यात आला आहे. सीएसआर फंडाच्या अंतर्गत पर्सिस्टंट फाऊंडेशनने या प्रकल्पासाठी पुढाकार घेत सौर ऊर्जा प्रकल्प बसविला आहे. तसेच, या प्रकल्पाचा खर्च करण्याबरोबरच त्याची दुरुस्ती व देखभालही फाऊंडेशनकडूनच करण्यात येत आहे.
याच धर्तीवर पुणे विभागातील इतर रेल्वे स्थानकांवर सौर पॅनल बसविण्यात येणार असून त्यासाठी प्रत्यक्ष स्थानकांची पाहणी करण्यात येत आहे. येत्या काही महिन्यात सौर प्रकल्प बसवण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पिंपरी रेल्वे स्थानकाला प्रतिमाह वीज बिलापोटी 27 हजार रुपये मोजावे लागतात. सौरऊर्जेचा वापर केल्यास वीज बिल निम्म्याने कमी होऊ शकते. तसेच येथे निर्माण होणाऱ्या अतिरिक्त उर्जेची विक्री करण्याचाही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.