सोलापूर – करोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सर्वसामान्य लोकांसाठी रस्त्यावर उतरुन जी कामगिरी केली, ते राज्यातील जनता कधीच विसरणार नाही. सोलापुरातही करोना रोखण्यासाठी पोलिसांनी आपले कर्तव्य तर बजावले, शिवाय शहरातील झपाट्याने वाढणारा प्रभाग ऑपरेशन “झिरो करोना’ अंतर्गत करोनामुक्त करत आहे. यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे.
सोलापूर शहरात सध्या लॉकडाऊनमध्ये रुग्णवाहिका, तर अनलॉकमध्ये इतर वाहनांबरोबरच रुग्णवाहिकेच्या सायरनचेच आवाज येत आहेत. राज्याच्या अन्य शहरांच्या प्रमाणेच सोलापूर शहरात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. मार्चमध्ये करोनाने हातपाय पसरायला सुरुवात केल्यानंतर 12 एप्रिल रोजी सोलापुरात करोनाचा पहिला रुग्ण आढळला.
12 एप्रिलनंतर एकेक करत करोनाचा कामगारबहुल प्रभाग क्रमांक 19 मध्ये शिरकाव झाला. विनायक नगर, गवळी वस्ती, देसाई नगर या भागात रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत होती. एकेक करत ही संख्या 75 वर गेली, तर मृतांची संख्या 7 झाली होती. परिस्थिती आणखी हाताबाहेर जाण्याची चिन्ह होती. मात्र, सोलापूर शहर पोलिसांनी करोना संसर्गाला नियंत्रणात आणले. आता प्रभाग क्रमांक 19 हा कामगारबहुल भाग करोनामुक्त झाला आहे.
विशेष म्हणजे करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनमध्ये कुणी बाहेर फिरकले नाही. औषधं हवी असल्यास, दवाखान्याला जायचे असल्यास नगरसेवकांनी त्यांच्या संयंसेवकांमार्फत त्यांची व्यवस्था केली. लागेल त्याला घरपोच किराणा पुरवठा केला, अर्थात यात पोलिसांची भूमिका महत्वाची ठरली. दरम्यान, या काळात पोलिसांना सुद्धा करोनाचा सामना करावा लागला.