सोलापूर – सोलापूरचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा बनावट जातीचा दाखला तयार करणाऱ्यास पोलिसांनी जेरबंद केले आहे. शिवसिद्ध बुळा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा जातीचा दाखला जात पडताळणी समितीने अवैध ठरवला होता. यानंतर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी जातीचा बनावट दाखल तयार केला होता.
डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना बेडाजंगम जातीचा दाखला सादर केला होता. तो दाखला आता समितीने अवैध ठरविला आहे. त्यामुळे त्यांच्या खासदारकीवर टांगती तलवार आहे. मात्र आता खासदार महोदयांनी जात प्रमाणपत्रासंदर्भात वेगळीच तक्रार दिली आहे.
अक्कलकोट-सोलापूर प्रवासादरम्यान वळसंग हद्दीत जातीचा दाखला गहाळ झाल्याची तक्रार त्यांनी केली आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या वळसंग पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे.