सोलापूर – मोहोळ तालुक्यातील पाटकुल गावातील उजनी पाटबंधारे विभागाचा उजवा कालवा रविवारी पहाटे फुटला. कालवा फुटल्याने डाळिंबासह ऊस व इतर पिके वाहून गेली असून शेतकऱ्यांच्या घरातही पाणी शिरले आहे. त्यामुळे शेकडो एकर क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. पावसाविना आलेल्या या संकटामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
उजवा कालवा 112 किमीचा आहे. रविवारी पहाटे पाटकुल ओढ्याजवळ हा कालवा अचानक फुटला. पाणी वेगाने आसपासच्या परिसरात शिरले. शेती व शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरल्याने एकच गोंधळ उडाला. पहाटेच्या वेळीस ही घटना घडल्याने स्थानिक नागरिकांना सुरुवातीला नेमकं काय झाले हेच कळाले नाही. पाऊस नाही नाही, मग कालव्यातून एवढे पाणी बाहेर आले कसे? धरण फुटले का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. मात्र नंतर उजवा कालवा फुटल्याचे स्पष्ट झाले व सर्वांचाच जीव भांड्यात पडला.
तात्काळ पंचनामे करण्याची मागणी
उजवा कालवा फुटल्याने पाण्याचा प्रवाह इतका मोठा होता की काही वाहने वाहून गेली. उजवा कालवा अचानक कसा फुटला. या घटनेला कोण जबाबदार आहे याची चौकशी होणार आहे. उजनी धरणातून उजव्या कालव्यामध्ये 500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु होता. अशावेळी कालवा फुटला. या घटनेत जिवित हानी झाल्याचे वृत्त तूर्त तरी नाही. पण हा धोका मोठा होता. शेतीचे नुकसान झाल्याने त्याचे तत्काळ पंचनामे करावेत. शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई करावी, अशी मागणी होत आहे.
हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात
घरात पाणी शिरल्याने प्रत्येकजण किमती वस्तूंचे नुकसान होऊ नये यासाठी धडपड होता. पाण्याची तीव्रता कमी झाल्यावर शेतकरी शेतीजवळ गेले. डाळिंब, ऊसाची पिके कापणीला आली होती. ही पिके पाण्यासोबत वाहून गेली. या आपत्तीमुळे शेतकरी चिंतेत आहेत. वाहून गेलेल्या शेतीची नुकसान भरपाई कशी होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.