सोलापूर जिल्हा अद्यापही तहानलेलाच

पुणे – राज्यात यंदा धुव्वाधार पाऊस झाला. पुणे, कोल्हापूर, मुंबई आणि कोकण भागांत तर पावसाने हाहाकार माजवला. तर दुसरीकडे सोलापूर आणि सांगलीच्या काही भागांत समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे आजही तब्बल 363 टॅंकरद्वारे सव्वासहा लाख नागरिकांची तहान भागवली जात आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक टॅंकरची संख्या आहे.

गतवर्षी परतीच्या पावसाने हुलकावणी दिली आणि पुणे विभागातील (पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर) कोल्हापूर सोडले तर सर्व जिल्ह्यांमध्ये टॅंकर सुरू करण्याची वेळ आली.

यावर्षी सोलापूर, सातारा, सांगलीसह पुणे जिल्ह्यांतही पाणी आणि चारा टंचाईने भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. वेळेत पाऊस झाला नाही तर, पाण्याविना मृत्यू होतील, अशी परिस्थिती काही वाड्या-वस्त्यांवर झाली होती. परंतु, वरूणराजाने जून महिन्यात हजेरी लावली आणि टॅंकरची संख्या हळूहळू कमी झाली.

राज्यातील कोल्हापूर, पुणे, मुंबई, कोकण-गोवा आणि अहमदनगर जिल्ह्यांत पावसाने धुव्वाधार बॅटिंग केल्यामुळे यावर्षी महापुराचे रूद्र रूप दिसले. एकीकडे पाण्याविना तडफटणारे जीव तर, दुसरीकडे पुराचे पाणी नाका-तोंडात गेल्यामुळे झालेली मनुष्य आणि पशुधन हानी. त्यामुळे नक्‍की ओला की सुका दुष्काळ आहे, कळत नाही.

आजही सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्‍यांमध्ये 262 टॅंकरद्वारे 5 लाख नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामध्ये करमाळा तालुक्‍यात सर्वाधिक 48 टॅंकर सुरू आहे. तसेच, मंगळवेढा येथे 48, सांगोला 47, माढा येथे 36 टॅंकर सुरू आहेत. त्याचबरोबर या जिल्ह्यातील 3 लाख पशुधन बाधीत आहेत.

सांगली जिल्ह्यातील पूर्व भागात येणारे जत, कवठेमहांकाळ या तालुक्‍यांमध्येही पाणी टंचाई असून, अन्य तालुके टॅंकरमुक्‍त झाले आहेत. जतमध्ये 58 तर, कवठेमहांकाळ येथे 2 टॅंकर सुरू आहेत. मात्र, पुणे जिल्हा टॅंकरमुक्‍त झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.