राजगुरुनगर (प्रतिनिधी) : आव्हाट ता. खेड येथील दरेवस्ती येथील डोंगरावरील जमिनीला मोठ्या आणि खोल पर्यंत भेगा पडुन जमीन खचू लागली आहे. त्यामुळे येथील वस्तीला भूस्खलन होण्याचा मोठा धोका निर्माण झाला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण परसले आहे.
दरेवस्ती (आव्हाट) ता खेड येथील उंच डोंगरावर जमिनीला गेली काही दिवस सुरु असलेल्या पावसामुळे जमिनीला खोलवर भेगा पडल्या आहे. या भेगांमुळे भूस्खलन होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. आंबेगाव तालुक्यात मागे घडलेली माळीण गावातील घटना पाहता येथील डोंगराला भेगा पडल्याने या वस्तीमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
माळीण गावासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरेवस्ती (आव्हाट) येथील शेतकरी भीतीच्या सावटाखाली आहेत.उंच डोंगराखाली दरेवस्ती मध्ये सुमारे ७-८ कुटुंब राहत आहेत. या शेतकऱ्यांकडे पशुधन आहे. पावसाचे प्रमाण कमी होत नसल्याने हा धोका वाढत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. गावातील इतर ग्रामस्थांचे त्यांच्यावर लक्ष असून त्यांना सुरक्षितथाळी हलवण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. या कुटुंबाची शेती याच ठिकाणी असल्याने ते वर्षानुवषे येथे वास्तव्यास आहेत.
आव्हातट गावातील ग्रामस्थांनी भूस्खलन होण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी तहसीलदार सुचित्रा आमले यांना परिस्थितीची माहिती दिली आहे. त्यांनी याभागाचा पंचनामा करण्याचे आदेश तलाठी सर्कल यांना दिले आहेत. हा अहवाल भु-संशोधन विभागातील अधिका-यांकडे पाठवल्यानंतर या भागाचे भूसंशोधन विभागाकडून पाहणी केली जाणार आहे.
दिवसेंदिवस येथील डोंगरावरील जमिनीच्या भेगा वाढत असून पावसाचे प्रमाण कायम आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाने तत्काळ उपयोजना करण्याची मागणी किरण वाळुंज, मारुती वाळुंज, नामदेव वाळुंज, अंबू वाळुंज, वसंत वाळुंज यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा