सातवीतील सोहमने तयार केली इलेक्‍ट्रॉनिक मोटारगाडी

प्रा.डी. के. वैद्य
अकोले – बुद्धिमत्ता, प्रदूषण समस्येची जाण आणि टाकाऊपासून टिकाऊ बनविण्याचे आत्मसात केले कौशल्य यामुळे सोहम शेणकर हा सातवीत शिकणारा विद्यार्थी उद्याचा अकोल्याचा संशोधक म्हणून पुढे आला तर आश्‍चर्य वाटणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती समोर आली आहे.

त्याने टाकाऊपासून टिकाऊ असे सूत्र डोळ्यापुढे ठेवले आणि बॅटरीच्या सहाय्याने इलेक्‍ट्रिकल -इलेक्‍ट्रॉनिक मोटारगाडी बनवून आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.सध्या तो कोते पब्लिक स्कूलला 7 वीच्या वर्गामध्ये प्रथम क्रमांकाने चमकत आहे. संशोधक म्हणून त्याची सुरुवात मुळात चौथीपासून सुरू झाली.

चौथीत शिकत असतांना सोहमने रिमोट कंट्रोल मोटारगाडी, रिमोट कंट्रोल ट्रॅक्‍टर बनवला होता आणि हायड्रॉलिक जेसीबी तयार करून विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रदर्शनामध्ये त्याने बक्षिसांची लयलूट केली. त्यामुळेच आता ऑनलाईन शिक्षणाच्या काळामध्ये त्याने बनवलेली इलेक्‍ट्रॉनिक-इलेक्‍ट्रिकल मोटारगाडी सर्वांच्या कौतुकाला पात्र ठरली आहे.

एकीकडे विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर करावा की करू नये? अशा वादविवादाच्या मुद्‌द्‌यावर करोना काळात ऑनलाइन शाळा सुरू झाल्या. तरीही या सोहम नावाच्या प्रखर बुद्धिमत्तेच्या मुलाने आपल्या मोबाईलचा वापर हा आपले कुतूहल शमवण्यासाठी केला. युट्युबला जाऊन वेगवेगळी दोन चाकी, तीन चाकी, चार चाकी वाहने त्याने अभ्यासली.

आज तो अशा एका उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे की त्याला प्रदूषणाच्या समस्येने चिंतेत टाकले आहे. आपल्या घरबांधणीच्या काळामध्ये घरामध्ये उरलेले पाईप, प्लायवूड, फिटिंग वायर या सगळ्या गोष्टी त्यांनी गोळा केल्या. विशेष बाब म्हणजे त्याने बॅटरी, इलेक्‍ट्रिकल आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स साहित्य हॉर्न व अन्य काही वस्तू हे सर्व ऑनलाइन मागवले.आणि इलेक्‍ट्रॉनिक- इलेक्‍ट्रिकल मोटारगाडी तयार केली.

अकोले नगरपंचायतचे प्रशासन विभाग अधिकारी उत्तम शेणकर हे त्याचे वडील.ते स्वतः औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्याने तो वारसा सोहमकडे संक्रमित झाला. पर्यायाने मोबाईलमध्ये आपले लक्ष केंद्रित करताना फक्त शैक्षणिक साधनांसाठी त्याने व्हिडीओ क्‍लिप्स पाहिल्या.

आजोबा व अकोले सोसायटीचे माजी चेअरमन मुरलीधर, आजी सुमनबाई, आई योगिता, काकी कविता, काका राजेंद्र आणि बंधू विनीत या सर्वांना त्याने सारखे सतावीत हे का? हे कसे ? याने काय होईल? असे प्रश्न चौथीपासून विचारीत त्यांना भंडावून टाकले. आपली कुतूहलाची व प्रश्नांची त्याने सोडवणूक करून घेऊन संशोधकीय वाटचालीचा श्रीगणेशा आखला आणि त्यातून यशस्वी झाला हे विशेष होय.

सोहमचे पुढील स्वप्न आर्किटेक्‍ट अथवा इंजिनिअर व्हायचे, असे त्याने प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले. भविष्यामध्ये दिवाळीच्या काळामध्ये लोखंडी पत्र्याची मोटारगाडी बनविण्याचा त्याचा मानस आहे. या सोहमला भविष्यामध्ये खूप मोठे व्हायचे आहे.

हे करताना घरातल्या सर्वांनाही सौख्य, समृद्धी आणि ऐश्वर्य मिळावे, यासाठी कष्ट घ्यायचे आहेत. त्यासाठी त्याला त्याचे संशोधन चालू ठेवायचे आहे. त्याची स्वप्नपूर्ती हे अकोल्याचे भविष्यात मोठे इप्सित साध्य झालेले असे त्याचे स्वप्न आहे, असे चर्चेतून स्पष्ट झाले. असे अनेक सोहम आपल्या गावात, तालुक्‍यात, जिल्ह्यात, राज्यात व्हावे अशा प्रकारची त्याची अपेक्षा ही थक्क करणारी होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.