बांधकामांची माहिती देणार सॉफ्टवेअर

पुणे – आता बीडीपीसह शहरात कोठेही होणाऱ्या आणि असलेल्या बांधकामांची माहिती देणारे सॉफ्टवेअर महापालिका तयार करणार असून येत्या तीन महिन्यांत ते कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्‍त सौरभ राव यांनी दिली. “चेंज डिटेक्‍शन सॉफ्टवेअर सिस्टिम’ असे हे सॉफ्टवेअर असून ते तयार करण्याचे काम सुरू असल्याचे राव यांनी नमूद केले.

शहरात मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकाम होते. त्यावर आळा बसावा यासाठी हे सॉफ्टवेअर तयार करण्यात येणार आहे. यामध्ये केवळ बीडीपीच नव्हे तर शहरात कोठेही बांधकाम सुरू झाले असेल तर त्याचा अलर्ट या सॉफ्टवेअरद्वारे येणार आहे.

या सॉफ्टवेअरमध्ये 2005 ते 15 आणि 2019 पर्यंतचे नकाशे आणि स्थितीही समाविष्ट केली जाणार आहे. नवीन बांधकाम परवानगी मिळते तेव्हा ती या सॉफ्टवेअरमध्ये नमूद केली जाणार आहे. परंतु, जेथे विनापरवाना बांधकाम सुरू झाले तर या सिस्टिमद्वारे अलर्ट मिळाल्यानंतर त्याठिकाणी अधिकारी जाऊन चौकशी करतील आणि काम थांबवतील अशी या मागची संकल्पना आहे.

या सॉफ्टवेअरचे सादरीकरण करण्यात आले आहे. विशेषत: बीडीपीतील अनधिकृत बांधकामांसाठी त्यासाठी काम करणाऱ्या काही अभ्यासक आणि स्वयंसेवी संस्थांपुढे त्याचे सादरीकरण करण्यात आले. मात्र, आमच्या गरजेनुसार त्यामध्ये बदल आणि अधिक बाबी समाविष्ट करण्याविषयी संबंधित सॉफ्टवेअर बनवणाऱ्या कंपनीला सांगण्यात आले आहे, असे राव यांनी सांगितले.

ऑगस्टपर्यंत सॉफ्टवेअर पालिकेच्या हातात
2005 पासून ते 2019 पर्यंतच्या नकाशांचाही समावेश त्यात करण्यात आला आहे. “महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटर’ यांच्याकडून 2019 चे नकाशे मिळण्यासाठी 30 दिवस आणि 2005 आणि 2015 चा नकाशा मिळण्यासाठी 45 दिवसांचा कालावधी लागणार आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात हे नकाशे मिळतील, अशी अपेक्षा असून त्यानंतर त्यांचा समावेश करून ऑगस्टपर्यंत शेवटच्या आठवड्यात हे सॉफ्टवेअर महापालिकेच्या हातात येईल, असे राव यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)