बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रास भेट
माळेगाव – आपण घेत असलेल्या प्रत्येक अन्नाच्या घासावेळी त्या अन्नपदार्थाच्या निमिर्तीकरीता शेतकऱ्यांने केलेल्या श्रमाची आपणास कल्पना यायला हवी, त्याची होणारी फसवणूक टाळावी, त्याच्याप्रती सर्वांनीच संवेदनशील असावे, असे प्रतिपादन कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले. बारामती येथील कृषि विज्ञान केंद्र, माळेगाव, कृषि महाविद्यालय, बारामती येथे भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, बारामती ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, डॉ. वसुधा बोंडे, उपविभागीय कृषि अधिकारी बालाजी ताठे, तालुका कृषि अधिकारी दत्तात्रय पडवळ, विश्वस्त डॉ. अविनाश बारवकर, राजीव देशपांडे, डॉ. सय्य्द शकीर अली, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कृषिमंत्री डॉ. बोंडे यांनी कृषि महाविद्यालयाची पाहणी केली. त्यांना महाविद्यालयाच्या कामकाजाबाबत तसेच अटल इन्कुबेशन सेंटरबाबत दृकश्राव्य माध्यमाद्वारे माहिती देण्यात आली.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोंडे म्हणाले, शेतीविषयक अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी निती आयोग व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींचा अभ्यास केला पाहिजे. देशामध्ये हरीतक्रांतीनंतर शेती उत्पादन वाढले. आपण अन्नधान्याच्या क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण झालो. परंतु शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये बदल झाला नाही. शेतीविषयक तंत्रज्ञान आणि योजना शेतकऱ्यांपर्यत पोहोचवाव्यात. शेतकऱ्यांनी आता कमीत कमी उत्पादन खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसे वाढेल, यावर भर द्यावा. शेती करता करता व्यापार शिकणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना कृषि विषयक साधनसाम्रगी कमी किंमतीमध्ये उपलब्ध झाल्यास त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल.
कार्यक्रमापूर्वी कृषिमंत्री डॉ. बोंडे यांनी माळेगाव कृषि विज्ञान केंद्र येथे भेट दिली. तेथील जैविक प्रयोगशाळा, माती परीक्षण प्रयोगशाळा, ग्रीन हाऊस, पॉली हाऊस, मृद जलसंधारण प्रात्यक्षिके, मलचिंग पेपर, क्रॉप पेपर वापर, ऊस बेणे लागवड, कोंबडी, शेळी, मेंढीपालन, मधुमक्षिका पालन आदी विभागांची त्यांनी पाहणी केली. इंडो-डच भाजीपाला प्रकल्पामधील शेतकऱ्यांशी संवाद साधला.
शारदानगर येथील कार्यक्रमामध्ये अजित पवार यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करुन कृषि महाविद्यालयामार्फत शेतक-यांकरीता करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रणवीर टकले, प्रा. सोनाली सस्ते यांनी केले.
शेतकऱ्यांना त्यांचा माल थेट बाजारपेठेमध्ये विक्री होण्याकरिता प्रयत्न केल्यास मध्यस्थ कमी होवून शेतकऱ्यांना जास्त नफा मिळू शकेल. त्याचा सन्मान वाढेल. महाविद्यालयामार्फत शेतकऱ्यांकरिता करण्यात येत असलेल्या विविध उपक्रम प्रेरणादायी आहेत.
– डॉ. अनिल बोंडे, कृषिमंत्री