समाज “उन्नती’साठी उर्जावान

कुंदा भिसे

असं म्हणतात की, चांगल्या कार्याची मनापासून सुरुवात केली की आपोआप त्याला मदतीचे हात येऊन मिळतात आणि त्या कार्याची सिद्धी होतेच. आपण ज्या समाजात राहतो, लहानाचे मोठे होतो त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो. समाजातील प्रत्येक घटक आपल्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावित असतो. या सर्वांना एकत्रित करून काहीतरी चांगले उपक्रम राबविले पाहिजेत, याच विचाराने प्रेरित होऊन पिंपळे सौदागर मधील कुंदा भिसे यांनी समाजकार्याची सुरुवात केली. नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी त्या नेहमी पुढे असतात. समाजातील विविध घटकांना एकत्र ठेवण्यासाठी तसेच त्यांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविण्यासाठी त्यांनी “उन्नती सोशल फाउंडेशन’ची स्थापना केली. सतत सकारात्मक उर्जेने भरलेल्या “कुंदाताई’ म्हणजे समाजाच्या “उन्नती’साठी उमद्या उत्साहाचे उल्लेखनीय उदाहरणच ठराव्यात!

दाताईंचे बालपण अध्यात्मिक वातावरणात गेले. त्यामुळे त्यांच्यात अध्यात्म आणि संगीताची आवड आपोआपच निर्माण झाली. समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे हे त्या नेहमीच मनी बाळगून होत्या. त्यांचे पती संजय भिसे यांचीही त्यांना नेहमीच साथ असते. त्यांचा असलेला खंबीर पांठिंबा आणि अतूट साथ याने प्रेरित होऊऩ कुंदा यांनी ‘उन्नती फाऊंडेशन’ची स्थापना केली. त्यातून त्यांनी समाजाकार्याला सुरुवात केली. समाजकार्याला एक विशिष्ट स्वरुप असेल तर सर्वांना एकत्र बांधून काम करता येते हे त्यांनी जाणले होते. उन्नतीच्या स्थापनेपासून वर्षभरामध्ये त्यांनी विविध उपक्रम राबविले.

पिंपरी चिंचवड शहराचा गेल्या दशकामध्ये मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे. या शहराचा वेगाने वाढणारा भाग म्हणजे पिंपळे सौदागर. सुसज्ज इमारती, शॉपिंग मॉल्स, मनोरंजनाची ठिकाणे अशा सर्व सुविधा पिंपळे सौदागरमध्ये अनुभवायाला मिळतात. तसेच कित्येक लोक येथे स्थायिक होण्यासाठी येतात. पिंपळे सौदागरची ही भरभराट केली ती येथील प्रशासनाने. समाजातील सर्व घटकांना एकत्र करून कार्यक्रम राबविणे, आर्थिक दुर्बलांना सक्षम करणे असे महत्त्वपूर्ण कार्य फाऊंडेशनच्या माध्यमातून केले जाते. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील सर्व वयोगटातील नागरिकांचे प्रबोधन करणे, लहानग्यांच्या मनावर पारंपारिक चालीरिती बिंबवणे, निसर्ग संवर्धनासाठी कार्यक्रम राबविणे असे विविध उपक्रम घेतले जातात.

समाजाच्या सर्व घटकांना जात, धर्म, भाषा या सर्व बंधनातून मुक्त करून एकत्र आणण्याचे काम फाऊंडेशनच्या माध्यमातून केले आहे. परिसरामधील नागरिकांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देऊन सर्वांना एकत्र करून समाजाची प्रगती करण्यासाठी उन्नती सोशल फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली असल्याचे कुंदा सांगतात.
उन्नती फाऊंडेशनच्या माध्यमातून ‘गजर भक्तीचा’ हा कीर्तन महोत्सव घेण्यात येतो. योगदिनानिमित्त योग कार्यशाळा, महापुरुषांची जयंती साजरी केली जाते.

‘उन्नतीचा गणपती’ हा महिला गणेश उत्सव साजरा केला जातो. यामध्ये आरती करण्याचा मान तृतीयपंथियांना दिला जातो, हे विशेष ! महिलांसाठी सुरू केलेल्या या गणेशोत्सवामध्ये विधवा, अंध महिलांनादेखील आरती करण्याचा मान दिला जातो. रक्षाबंधनाच्या दिवशी जवानांना राखी बांधून उन्नतीच्या महिला सभासद सण साजरा करतात. उन्नतीने समाजातील सर्व घटकांसाठी त्यांच्या उन्नतीसाठी, त्यांच्या सन्मानासाठी योगदान दिले आहे. विद्यार्थ्यांच्या उज्जवल भविष्यासाठी कुंदा नेहमी प्रोत्साहन देतात. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कऱणे, शिक्षकांचा सन्मान कऱणे, अनाथ विद्यार्थ्यांचा विमा काढणे, लहान मुलांसाठी विविध उपक्रम घेणे या माध्यमातून त्यांनी मुलांना जोडले आहे. महापालिका शाळेतील एक हजारपेक्षा जास्त मुलांचा त्यांनी विमा काढला आहे.

माणसाला प्रगती करायची असेल तर त्याला वाचनाची आवड पाहिजे हे कुंदा यांनी हेरले. वाचनाने माणूस समृद्ध होतो. त्यासाठी प्रभागातील नागरिकांसाठी त्यांनी ‘विठाई’ हे मोफत वाचनालय सुरू करून दिले. येथे विविध प्रकारची पुस्तके वाचनासाठी ठेवली आहे. गणपती, नवरात्री व दिवाळी अशा सणांमध्ये भारतीय संस्कृती जपत वेगवेगळे उपक्रम राबवून त्यांनी जनजागृती केली आहे. पाणी फाऊंडेशनच्या चला गावाकडे उपक्रमामध्ये सहभाग, एकच लक्ष दहा हजार वृक्ष, ऋणानुबंध- परिवार एकीकरण, तिरंगा सन्मान, स्वरामृत दिवाळी पहाट, किल्ले बनवा स्पर्धा, स्वच्छ पवना नदी अभियान, पिंपळे सौदागर भजन स्पर्धा, महिला सबलीकरणासाठी पुणे ते दिल्ली सायकल रॅली हे उन्नती फाउंडेशनच्या माध्यमातुन आयोजित होणारे आणखी काही ठळक उपक्रम.

आपल्या या अनोख्या कार्याबाबत कुंदाताई म्हणाल्या की, ‘माझ्यासाठी समाजकारण म्हणजे वंचितांना मदत आणि समाजामध्ये जनजागृती करणे होय. हा जनसेवेचा वसा मी व माझे पती दोघेही मिळून सुरू ठेवू. यापुढेही मी उन्नतीच्या माध्यमातून सर्व सभासदांच्या साथीने समाजोपयोगी कार्यक्रम, उपक्रम आयोजित करत राहील. भिसे कुटुंबियांचा हा समाजकारणाचा वारसा पुढे घेऊन जायचा आहे. ज्यावेळी नागरिकांसाठी काम करते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान एक वेगळी उर्जा देते.’

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.