- प्रवेशद्वारावरच सॅनिटायझर, ऑक्सिमीटर, थर्मलगन
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शहरातील गृहनिर्माण सोसायट्या “अलर्ट’ झाल्या आहेत. करोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी सोसायटी स्तरावर आवश्यक दक्षता घेतली जात आहे.
शहरात सध्या दररोज दोन हजारांपेक्षा अधिक करोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्याशिवाय, रुग्णालयात उपचार घेत असलेले आणि गृहविलगीकरणातील असे 25 हजारांपेक्षा अधिक सक्रिय रुग्ण आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्यभरात कडक निर्बंध जारी केले आहेत.
त्याच बरोबरीने वीकेंड लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली आहे. शहरात साडेतीन हजारांपेक्षा अधिक सोसायट्या आहेत. करोनाची सध्या आलेल्या लाटेत पूर्ण कुटूंब करोनाबाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे.
या पार्श्वभूमीवर, सोसायट्यांनी देखील आवश्यक दक्षता घेण्यास सुरूवात केली आहे. सोसायटीमध्ये प्रवेश करतेवेळी प्रवेशद्वारावरच सॅनिटायझर बसविण्यात आले आहे. ऑक्सिमीटरद्वारे व्यक्तीची ऑक्सिजनची पातळी, थर्मल गनद्वारे शरीराचे तापमान मोजण्याची व्यवस्था केली आहे. सोसायटी आवारामध्ये पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी जमू नये, यावर लक्ष केंद्रीत केले जात आहे.
सोसायट्यांतील जलतरण तलाव, क्लब हाऊस बंद केले आहेत. तसेच, मास्क घालणे बंधनकारक केले आहे. त्याशिवाय, सोसायटीचे सुरक्षारक्षक, हाऊसकिपींगचे काम करणारे कामगार यांचे लसीकरण केले जाणार आहे. तसेच, सोसायटी स्तरावर लसीकरण शिबिरांचे आयोजन केले जात आहे. त्याशिवाय, एका सोसायटीमध्ये पाच व्यक्तींपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळल्यास संबंधित सोसायटीला “मायक्रो कन्टेन्मेंट झोन’ समजले जाणार आहे. सोसायटीच्या प्रवेशद्वारावर त्याबाबत माहिती देणारे फलक लावून सोसायटीत बाहेरून येणाऱ्या नागरिकांना प्रवेश नाकारला जात आहे.
करोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने आता सोसायटी स्तरावर आवश्यक दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. करोना नियंत्रणासाठी सॅनिटायझर, ऑक्सिमीटर, थर्मलगन आदी साहित्यांचा वापर केला जात आहे. त्याशिवाय, मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग यांना प्राधान्य दिले आहे. सोसायटी आवारात पाचपेक्षा आधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास प्रतिबंध केला जात आहे.
– तेजस्विनी डोमसे-सवाई, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन.