मकर संक्रांतीनिमित्त नात्याला ‘सोशल टच’

पिंपरी – मकर संक्रांत या सणाला एकमेकांना तिळगूळ देऊन नात्यातला गोडवा वाढविला जातो. गेल्या वर्षभरात करोनामुळे निर्माण झालेले मळभ आता हळूहळू उतरू लागले आहे. करोनावरील लसीचे वितरणही सुरू झाले आहे. संक्रांत हा सण साजरा करताना गुरुवारी (दि. 14) सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा पत्र, शुभेच्छा संदेश यांची देवाणघेवाण झाली. “सोशल टच’ देत नात्यातला गोडवा वाढविण्यात आला.

ज्यांना प्रत्यक्ष भेटणे शक्‍य आहे त्या आप्तस्वकीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना तिळगूळ देण्यात आले. तसेच, “तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ या प्रेमळ शब्दांनी नात्याला अधिकाधिक घट्ट करण्यात आले. मकर संक्रांत या सणाच्या तिळगूळ, तिळाची वडी, तिळाचे लाडू यांची देवाणघेवाण होते.

महिला वर्गाकडून घरोघरी काही दिवस आधीपासूनच तिळाच्या वड्या व लाडू बनविण्यात येतात. त्याचा बच्चे कंपनी मनमुराद आस्वाद घेतात. त्याशिवाय, या सणाच्या दिवशी पतंग उडवण्याची प्रथा आहे. त्यासाठी आवर्जून पतंग खरेदी केली जाते. घराच्या गच्चीवर, मैदानात पतंग उडवण्याचा आनंद बालगोपाळांनी घेतला. नॉयलान मांजावर बंदी असल्याने पतंगासोबत साधा दोरा वापरण्यावर भर देण्यात आला.

सध्या जग आधिक “टेक्‍नोसेव्ही’ झाले आहे. धकाधकीची जीवनशैली, वाढत चाललेले ताणतणाव, कामाच्या वेळा सांभाळण्यासाठी होणारी धावपळ यामुळे गाठीभेटी कमी झाल्या आहेत. तथापि, नात्यातील स्नेहबंध दृढ राहावे, यासाठी आवर्जून सोशल मीडियाचा आधार घेतला जात आहे. व्हॉट्‌सअप, फेसबुक, ट्विटर आदींच्या माध्यमातून आज सकाळपासूनच शुभेच्छा संदेश आणि शुभेच्छा पत्रांची देवाणघेवाण सुरू होती. “शब्देविण संवादू’ याचाच प्रत्यय त्यामुळे येत होता. त्याशिवाय, आप्तस्वकीय आणि मित्र परिवाराशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून देखील शुभेच्छांची देवाणघेवाण करण्यात आली.

शहरातील बाजारपेठांमध्ये तिळगूळ, तिळवडी, तिळाचे लाडू आदींची खरेदी सुरू होती. महिला वर्गाकडून मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी-कुंकवाचे कार्यक्रम करण्यात येतात. या कार्यक्रमांना आजपासून सुरुवात झाली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.