कृतीशील समाज सुधारक बसवण्णा

भारत ही संताची भूमी म्हणून ओळखली जाते. असंख्य महान संतांनी भारतीय संस्कृतीला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे महत्वपूर्ण कार्य केलेले आहे. भारत आजही जगाला अध्यात्माचे धडे देत आहे. प्रत्येक काळामध्ये तत्कालीन समाज जीवनातील चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याचे काम त्या त्या काळातील महान विभूतींनी केलेले आहे. याच परंपरेतील एक नाव म्हणजे जगतज्योती महात्मा बसवेश्‍वर. ज्यांची जनमानसात बसवण्णा म्हणून ओळख आहे.

बसवेश्‍वर यांचा जन्म कर्नाटकमधील विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी या गावामध्ये झाला. त्यांचा जन्म वैशाखातील अक्षय तृतीयेला झाला. प्रारंभिक अध्ययन त्यांनी कुडलसंगम येथे पूर्ण केले. भाषा, धर्म, तत्वज्ञान यांचे त्यांनी शिक्षण घेतले. संपूर्ण आयुष्य समताधिष्टीत समाज निर्मितीसाठी व्यतीत करण्याचे त्यांनी ठरविले. ज्यावर ते आयुष्यभर चालले. माणसाची ओळख ही जन्माने नव्हे तर तो जे त्याच्या आयुष्यात कर्म करतो त्यावरून होते. मात्र, बाराव्या शतकामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ, जातीय उतरंडी आणि एकंदरीत कर्मकांडामध्ये खितपत पडलेला समाज पाहून बसवेश्‍वर यांनी लिंगायत धर्माच्या तत्त्वाखाली सर्व समाजाला एकत्र केले. ज्या धर्माचे तत्वच मुळामध्ये माणुसकीला मानणारे होते. जिथे उच्च नीच, स्त्री पुरूष भेदाभेद असे काहीच नव्हते. तत्कालीन समाजाला एकरूप करीत बसवेश्‍वरांनी जाती अंताच्या लढाईची मुहूर्तमेढ रोवली. ज्यांना ओळख नव्हती, तत्कालीन व्यवस्थेत खितपत पडलेल्या स्त्रिया, ज्यांना माणूस म्हणून जगण्याची आस नव्हती अशा सर्व बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार सामान्य जनांना एकत्र आणून जगण्याची नवी उमेद त्यांनी दिली.

लोकशाहीबद्दल आपण ज्यावेळी बोलत असतो त्यावेळी प्रामुख्याने पश्‍चिमी देशांचे, अब्राहम लिंकन तसेच मॅग्नाकार्टा या सर्वांच्या योगदानाबद्दल चर्चा करीत असतोत. मात्र, त्याचवेळी आपण हे विसरतो की, जगातील पहिल्या लोकशाहीचा पाया महात्मा बसवेश्‍वर यांनी अनुभव मंडपाच्या माध्यमातून घातलेला आहे. ज्याबद्दल आज जगभर चर्चा केली जात आहे. अनुभव मंडप म्हणजे त्याकाळातील ती संसद होती. जिथे लोकांच्या समस्यांबद्दल चर्चा करून त्यावर निर्णय घेतला जात असे. हे एक मुक्त व्यासपीठ होते. या संसदरूपी अनुभव मंडपात सर्वांना मुक्त प्रवेश होता. सर्व जाती धर्माचे लोक तसेच महिलांचाही यामध्ये समावेश होता. मात्र, यामध्ये प्रवेशासाठी एक अट होती. ती अट होती श्रमदानाची! राजा असो वा सामान्य नागरिक सर्वांनी श्रमदान करायचे आणि अनुभव मंडपात प्रवेश करायचा हा नियम होता.

बसवेश्‍वर यांची वचने ही सर्वांनी अभ्यासली पाहिजेत अशीच आहेत. ज्या माध्यमातून त्यांनी दया, अहिंसा, सत्य, सदाचार, नीती, शील, समानता, बंधुभाव, माणुसकी आदी तत्वांचा प्रचार केला. विशेष म्हणजे त्यांनी आपले साहित्य लोकभाषेत लिहिले. ज्यामुळे ते सामान्य माणसांना समजण्यास सुलभ झाले.

समकालीन स्थितीमध्ये दिवसेंदिवस ऑनर किलिंगच्या घटना वाढत आहेत. मात्र, बाराव्या शतकामध्ये बसवेश्‍वरांनी आंतरजातीय विवाह लावून दिला. बालविवाहास त्यांनी विरोध केला आणि विधवा पुनर्विवाहास प्रोत्साहन दिले. महिलांना सन्मानपूर्वक जगण्याचा अधिकार उपलब्ध करून दिला.

कायकवे कैलास म्हणजे श्रम हाच कैलास (स्वर्ग) आहे म्हणत त्यांनी श्रम प्रतिष्ठा वाढविली. समतेचा विचार रुजवत, सामाजिक न्यायासह शोषणरहित समाज निर्मितीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या कृतीशील समाज सुधारक महात्मा बसवेश्‍वर यांच्या येणाऱ्या जयंतीनिमित्त सर्वांना मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा.

– श्रीकांत येरूळे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.