पिंपरी – श्रावण महिना सुरू होताच व्रतवैकल्य आणि सणांची चाहुल लागते. नागपंचमी, रक्षाबंधन, गणेशोत्सव असे एकापाठोपाठ एक सण सुरू होतात. तसेच गणपती बाप्पांच्या आगमनाची ओढ लागते. एक-एक दिवस मोजला जाऊ लागतो. या महिन्याच अखेरीस गणरायांचे आगमन होणार असल्याने बाजारपेठ सजली आहे. तसेच सोशल मीडियावरही सध्या गणपती बाप्पा मोरया सुरू आहे. श्रीं ची मूर्ती, सजावटीचे व पूजा साहित्य व इतर वस्तुंची सध्या ऑनलाइन जाहिरात होत आहे. काहींनी तर त्यासाठी व्हॉट्सऍप ग्रुप, इन्स्टाग्राम, फेसबुक पेज तयार केले असून यंदा बाप्पा सोशल मीडियावर आले आहेत.
गणेशोत्सवासाठी मूर्तींचे आधीपासूनच बुकींग केले जात असून शहरात विक्रेते आणि मूर्तीकार विविध आकार आणि रुपातील मूर्ती उपलब्ध करून देतात. त्यामुळे उंची, रंग, आकार आणि आकर्षक रुपातील मूर्तींची निवड करायला या काळात भक्तांनाही संधी मिळते. चिंचवड, रावेत, वाकड, निगडी, पिंपरी आणि उपनगरांमध्ये मूर्तींचे स्टॉल लागले आहेत.
त्याचप्रमाणे अनेकजण सोशल मीडियावर देखील आपल्याकडील मूर्तींचे फोटो आणि व्हिडीयो पाठवून बुकींग घेत आहेत. करोनाकाळात अनेकांनी गणेशमूर्तींची होम डिलिव्हरी दिली होती. तशीच यंदाही अनेकांनी गणेशमूर्ती थेट घरपोहच पाठविण्याची तयारी सुरू केली आहे. पारंपरिक रूपातील, एका रंगातील मूर्तींना अजूनही पसंती मिळते. स्टॉलवर टिळक पगडी, दगडूशेठ प्रतिकृती, आभूषणांनी सजलेले, चौरंगावरील बैठी मूर्ती, उभा गणेश, कमळाच्या फुलात, जास्वंदीच्या फुलात बसलेल्या मूर्तींना पसंती मिळत आहे.
मखर व इतर साहित्य
गणरायाच्या आगमानपूर्वीची सजावट ठरलेली असते. भाविक मोठ्या हौसेने गौरी-गणेशाला विराजमान करण्यासाठी आकर्षक सजावट करतात. या सजावटीसाठी लागणारे साहित्य देखील ऑनलाइन दिसू लागले आहे. एवढेच नव्हे तर पूजा सामग्री आणि पूजा सांगणारे गुरुजी देखील ऑनलाइन उपलब्ध आहेत. बहुतेक नागरिकांचा कल तयार मखर घेण्याकडे आहे. अशा मखर ऑनलाइन मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच बेडसीट्स, पडदे, विद्युत रोषणाई, अशा अनेक गोष्टी ऑनलाइन उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये प्रत्येक व्यवसायात तरुण उतरत असल्याने नवनवीन कल्पना सोशल मीडियावर पहावयास मिळत आहेत. न विझविणारे दिवे, केळीच्या खुंट्यांसाठी स्टॅंड, आकर्षक विद्युत माळा आणि सर्व काही मेड इन इंडिया दिसत आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक व अन्य पदार्थांची देखील सोशल मीडियावर जाहिरात सुरू आहे.
शाडूमातीच्या मूर्तींना पसंती
सध्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना बंदी आहे. त्यामुळे स्टॉलवर प्रामुख्याने कमी उंचीच्या तसचे शाडू मातीच्या मूर्तीं विक्रीसाठी आहेत. शाडू मातीच्या मूर्तीमध्ये जास्त विविधता देता येत नाही. तसेच रंगालाही मर्यादा येतात. मूर्ती पाण्यात विरघळत असल्याने नागरिकांकडून शाडूमातीच्या मूर्तीची विचारणा होत आहे. खास पेणहून विक्रीसाठी मूर्ती आणल्या आहेत, असे विक्रेत्यांनी सांगितले.