नवी दिल्ली – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्या विषयी त्यांची बदनामी केल्याच्या कारणावरून दिल्लीतील एका मुक्त पत्रकाराला उत्तरप्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेवरून सोशल मिडीयात उत्तरप्रदेशातीाल भाजप सरकारच्या विरोधात प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला असून या पत्रकाराची त्वरीत सुटका करण्यात यावी अशी मागणी हजारो लोकांनी केली आहे. प्रशांत कनोजीया असे या मुक्त पत्रकाराचे नाव आहे.
त्याने योगी अदित्यनाथ यांच्या निवासस्थाना बाहेरील एका महिलेचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला होता. या महिलेने तेथे उपस्थित असलेल्या पत्रकारांना आपण योगींना आपल्याशी विवाह करण्याचा प्रस्ताव दिला आहे असे सांगितले होते. हा व्हिडीओ कनोजीया यांनी सोशल मिडीयावर प्रसारीत केल्यामुळे उत्तरप्रदेश पोलिसांनी त्याच्या विरोधात मुख्यमंत्र्यांची बदनामी केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्याच अनुषंगाने त्याला आज अटक करण्यात आली आहे.