सामाजिक न्याय भवनाला आली झळाळी

जात पडताळणीसह महामंडळांची कार्यालये एकाच छताखाली – विद्यार्थ्यांसह नागरिकांची गर्दी

लिफ्ट अन्‌ फर्निचरचा प्रश्‍न बाकी

न्याय भवनाच्या इमारतीमध्ये लिफ्ट आणि फर्निचरचे काम अद्याप बाकी आहे. याबाबत सहा. समाजकल्याण आयुक्त सचिन कवले यांच्याशी संपर्क साधण्यात आला असता कवले म्हणाले, लिफ्टचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. ते लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. तर नूतन इमारतीमध्ये फर्निचरचा प्रस्ताव आयुक्तांनी मंत्रालयात पाठविला आहे. मंजुरीनंतरच फर्निचरच्या कामाला सुरूवात होईल, असे कवले यांनी सांगितले.

स्वच्छता, सुरक्षितता अन्‌ वृक्षारोपण

सामाजिक न्याय भवनाचा परिसर आणि इमारतीमध्ये स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले आहे. त्याचबरोबर सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्व कामं खासगी संस्थेमार्फत करण्यात येत आहे. त्याचबरोबर येत्या काही दिवसांमध्ये परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यासाठी खड्डेही खोदण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काळात न्याय भवनाच्या इमारतीच्या परिसरात हिरवाई निर्माण होणार आहे.

 

सातारा – दैनिक प्रभातच्या पाठपुराव्यानंतर उद्‌घाटन झालेल्या सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीला नागरिकांच्या गर्दीने झळाली मिळाली आहे. न्याय भवनाच्या इमारतीमध्ये जातपडताळणी प्रमाणपत्र कार्यालयासह बहुतांश महामंडळांची कार्यालये स्थलांतरित करण्यात आली आहेत. परिणामी एकाच छताखाली सुलभ सेवा मिळत असल्यामुळे विद्यार्थी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर सामाजिक न्याय भवन उभारण्याचा निर्णय कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारने घेतला. त्यानुसार तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात आठ वर्षापूर्वी सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. सुरूवातीला संबंधित जागेवर झोपडपट्ट्यांच्या अतिक्रमणांच्या प्रश्‍न उपस्थित झाल्यामुळे इमारतीचे बांधकाम धिम्या गतीने सुरू राहिले. तर दरम्यानच्या कालावधीत माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी भेट देत इमारतीच्या बांधकाम दर्जाबाबत प्रश्‍न उपस्थित केले आणि त्याचबरोबर बांधकाम परीक्षणाचे आदेशही दिले. अशा स्थितीत अपूर्ण कामे पूर्ण करून इमारती उभ्या राहिल्या.

मात्र, पुढे इमारतीचे बांधकाम पूर्ण होवूनही त्यामध्ये समाज कल्याणसह इतर कार्यालये स्थलांतरित झाली नव्हती. सार्वजनिक बांधकाम आणि समाजकल्याण विभागामध्ये समन्वयाचा अभाव राहिल्यामुळे इमारतीवर धूळ चढली होती. त्याबाबतची वृत्त मालिका “दै. प्रभात’ने प्रसिध्द केली. त्याचबरोबर वेळोवळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्याकडे “दै. प्रभात’ने पाठपुरावा केला. परिणामी चार महिन्यांपूर्वी तत्कालिन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सामाजिक न्याय भवनाचे उद्‌घाटन उत्साहात झाले.
त्यानंतर न्याय भवनाच्या एका इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर सहा. समाजकल्याण आयुक्त कार्यालय व दुसऱ्या मजल्यावर जिल्हा जातपडताळणी कार्यालये दिमाखात सुरू झाली आहेत.

सध्या जिल्हा जातपडताळणी कार्यालयातदेखील प्रस्ताव दाखल करण्यासाठी विद्यार्थी व पालकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसून येत आहे. त्याचबरोबर दुसऱ्या इमारतीमध्ये महात्मा फुले विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळाची कार्यालये स्थलांतरीत झाली आहेत. कालपर्यंत ही महामंडळे आणि जातपडताळणी कार्यालयांसाठी भाड्याने जागा घ्यावी लागली होती. त्याचबरोबर ती जागा प्रशस्त नव्हती. मात्र, आता न्याय भवनाच्या निमित्ताने प्रशस्त इमारत उपलब्ध झाल्यामुळे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे दिसून येत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here