निवडणुकीचा सोशल ज्वर

– रोहन मुजूमदार

पुणे – लोकसभा निवडणुकील जेमतेम दोन महिने शिल्लक असतानाच प्रचारासाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात प्रचार करण्यासाठी राजकीय पक्षांनी आपापली अस्त्रे पाजरायला सुरुवात केली आहे. येत्या निवडणुकीत सोशल मीडियावर राजकीय पक्षांचे युद्ध पेटणार यात कोणाचाही दुमत नाही.

देशातील राजकीय पक्ष आता सोशल मीडियावर अधिक सक्रीय झाल्या आहेत. या युद्धासाठी भाजप व कॉंग्रेस, राष्ट्रवादीसह सर्वच राजकीय पक्षांनी डिजिटल प्लॅटफार्म वापरण्यास सुुरुवात केली. यात माहितीचे विश्‍लेषण, माहिती पाठवण्यासाठी “वॉर’ रूम तयार केल्या आहेत. यासाठी हजारो सामाजिक योद्धे व स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. देशात पहिल्यांदा सोशल मीडियाची ताकद भाजपने ओळखली. त्यानंतर भाजपने विरोधी पक्षांना आव्हान देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला. 2014च्या निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रावादी कॉंग्रेससह इतर प्रचारात मागे पडली होती. त्यातून धडा शिकत 2019 च्या निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपच्या सायबर आर्मीला तोंड देण्यासाठी तयारी सुरू केली. प्रत्येक पक्षांचे सोशल मीडियावर विभागावर “वॉर’रूम अनेक महिन्यांपासून सज्ज ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, निवडणुकांची तारीख जाहीर होताच आता विजय आपलाच’, अमुक अमुक पक्षाला मत म्हणजे विकासाला मत’, एकच वादा…अमुक तमुक दादा’, अरे आवाज कोणाचा…’ अशा एक ना अनेक घोषवाक्‍ये सोशल मीडियावर धुमाकुळ घालणार यात कोणाचेही दुमत नाही.

उन्हाला अद्याप सुरुवात झाली नसली, तरी निवडणुकांमुळे सोशल मीडियावर मात्र प्रचाराचा वणवा जोरात पेटला आहे. पक्षाची राजनीती निश्‍चित करण्यासाठी व्हॉट्‌सऍपवर विविध पक्षांचे समूह तयार झाले आहेत. फेसबुकवर विविध पक्षांचे, स्थानिक पातळीवर विशिष्ट पक्षाचे, संभाव्य उमेदवाराचे नवीन पेज बनवले असून उमेदवारांच्या पेजला जास्तीत जास्त लाईक्‍स कसे मिळतील, याची पुरेपूर काळजीही कार्यकर्ते घेत आहेत. एखाद्या कार्यक्रमाचे फोटो, केलेल्या विकासकामांची फोटोसकट माहितीही कार्यकर्ते फेसबुकवर अपलोड करत आहेत. कुणा भाऊंचा गॉगल लावून फोटो; तर कुणा दादांचा एकदम हटके स्टाईलमधील फोटो. अशा या फोटोंच्या भाऊगर्दीने सोशल मीडिया हाऊसफुल्ल झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.