महात्मा फुलेंच्या विचारांवर आधारित सामाजिक विकास

महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांची ग्वाही : महात्मा फुले यांच्या जयंतीनमित्त अभिवादन

पुणे – “बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी करणाऱ्या आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांवर आधारित सामाजिक विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,’ अशी ग्वाही पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी दिली.

महात्मा फुले यांच्या 193 व्या जयंतीनमित्त “समता भूमी’ येथे त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बापट यांनी अभिवादन केले. यावेळी नगरसेवक राजेश येनपुरे, सम्राट थोरात, महेश लडकत, आरती कोंढरे, मनिषा लडकत, विजयालक्ष्मी हरिहर, हेमंत रासने, अजय खेडेकर, विशाल धनवडे, अविनाश साळवे, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, संदीप लडकत, विष्णू हरिहर, राजेश बारगुजे, संदीप गायकवाड, योगेश पिंगळे, मंजिरी धाडगे, वैशाली नाईक, प्रमोद कोंढरे आदी उपस्थिती होते.

“समाजातील विषमता दूर करण्यासाठी स्त्री शिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुला-मुलींचे शिक्षण यावर महात्मा फुले यांनी भर दिला. सामाजिक न्यायाबाबत त्यांचे विचार सुस्पष्ट होते. त्यांच्या विचारांच्या आधारेच आम्ही राज्यकारभार करत आहोत,’ असे बापट म्हणाले.

“महात्मा फुले यांच्या विचारांवर आधारित समाजाचा विकास करण्याच्या उद्देशाने सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. इतर मागासवर्गीय समाजासाठी राज्यात स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात आले आहे. राज्यात 32 टक्के इतर मागासवर्गीय समाज आहे. त्यांचा विकास करण्यासाठी या मंत्रालयामार्फत 24 योजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. इतर मागासवर्गीय समाजासाठी क्रिमेलिअरची वार्षिक उत्पन्न मर्यादा साडेचार लाखांहून सहा लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयांमुळे या समाजाच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. त्यामुळे तो महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभा राहील असा विश्‍वास वाटतो,’ असे बापट यांनी नमूद केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.