– अमित शुक्ल
वन नाइट स्टँड हा एक सामाजिक मुद्दा आहे. त्यावर बोलणे, चर्चा करणे, लिखाण करणे या गोष्टी आपल्याला आवडणार नाहीत. मात्र, सध्याच्या काळात पाश्चात्य संस्कृतीपासून निर्माण झालेले आणि आपल्या देशाची सामाजिक घडी मोडणारे तसेच भारतीय संस्कृतीला दूषित करणारे हे एक कटू सत्य आहे. या प्रवृत्तीला वेसण घालणे आपल्यासाठी शक्य आहे का?
गेल्या तीन-चार दशकांमध्ये भारतात पाश्चिमात्य जीवनशैलीचे अनुकरण करण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत गेले. आता ही बाब राहणीमानापुरती किंवा जीवनशैलीपुरती मर्यादित न राहता शारीरिक संबंधापर्यंत पोचली आहे. अनेकजण कॅज्युअल सेक्स म्हणजेच ‘वन नाइट स्टँड’चे अनुकरण करताना दिसत आहेत. परिणामी आंग्लाळलेल्यायुगात काहीजण शारीरिक सुखासाठी आपल्या जोडीदाराची ङ्गसवणूक करताना दिसत आहेत. यालाच आधुनिक जीवनातील ‘वन नाइट स्टँड’ असे म्हटले जाते. आजच्या कथित आधुनिक आणि खुल्या विचारांच्या जगाची ही काळी बाजू आहे.
7 ऑक्टोबर 2023 मध्ये एका संशोधन अहवालानुसार, अमेरिकेत सर्वाधिक ‘वन नाइट स्टँड’ होतात. ‘वन नाइट स्टँड’कडे कॅज्युअल सेक्सप्रमाणे पाहिले जाते. 66 टक्के अमेरिकी नागरिकांनी ‘वन नाइट स्टँड’चा अनुभव घेतल्याचे सांगितले. अमेरिकेत 48 पुरुषांनी आपण कॅज्युअल सेक्समध्ये सक्रिय असल्याचे सांगितले असून 36 टक्के महिलांनी ‘वन नाइट स्टॅड’मध्ये असल्याचे मान्य केले. मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात, सहजगत्या प्रस्थापित होणारे शारीरिक संबंध किंवा वन नाइट स्टँड संकल्पना एकप्रकारे अविश्वसनीय रूपातून आकर्षक आणि तणावमुक्त असते. ‘वन नाइट स्टँड’ हे एकाप्रकारे कॅज्युअल सेक्स आहे आणि यात भावना आणि जाणिवेला कोणतेही स्थान नसते. मात्र, काहीजण ‘वन नाइट स्टँड’ला प्रेम समजतात आणि काहीजण प्रयोग समजतात.
गेल्या काही वर्षांपासून देशात चोरी छुप्यामार्गाने ‘वन नाइट स्टँड’चे प्रमाण खूप वाढले आहे. आजच्या घडीला अनेक जण भावनाविरहित नात्यांची निवड करत आहेत. अशा ठिकाणी शारीरिक संबंधांना अधिक प्राधान्य दिले जाते. मानसोपचार तज्ज्ञाच्या मते, एकीकडे पुरुष ‘वन नाइट स्टँड’ला यश मानत त्याकडे बोनसप्रमाणे पाहात असतात, तर त्याचवेळी मध्यमवर्गीय कुटुंबातील महिला आपले आकर्षण कायम ठेवण्याची हमी देणारा मार्ग असल्याचे मानतात;
परंतु कालांतराने त्यांना खंत वाटते आणि या प्रकाराचा उबग आल्याचेही मान्य करतात. नॉर्वेच्या ‘नॉर्वेजियन युनिव्हर्सिटी ऑङ्ग सायन्स अँड टेक्नॉलॉजी’मध्ये प्रकाशित एका अभ्यास अहवालात म्हटले, ‘वन नाइट स्टँड’ करणार्या महिलांपैकी 35 टक्के महिलांना या अनुभवाबद्दल पश्चाताप होत आहे. परंतु या मुद्द्याशी जोडलेले मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात, ‘वन नाइट स्टँड’च्या शोधात काही महिला ‘हॉट’ जोडीदार शोधण्याचा प्रयत्न करत असतात. काही महिला मस्ती करण्याचा विचार करत असतील तर त्या अशा ‘हॉट’ जोडीदाराचा शोध घेणार नाहीत. कारण त्यांचा शोध एक स्मार्ट, आकर्षक दिसणार्या पुरुषांजवळ येऊन थांबतो.
दुसरीकडे मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात, पुरुष केवळ शारीरिक संबंध ठेवण्यासाठी इच्छुक असतात, मग त्यांचा जोडीदार कसाही आकर्षक असो किंवा नसो, त्यांच्या आवडीनुसार असो किंवा नसो त्याचा काही ङ्गरक पडत नाही. बॉलीवूड किंवा हॉलीवूडच्या चित्रपटात आणि वेब मालिकेत अशा प्रकारचे संबंध सहजपणे दाखविले जात आहेत. या मालिकेच्या माध्यमातून नात्यानात्यांतील आदर संपवत सर्वकाही शारीरिक संबंधापर्यंत नेले जात आहेत. एका अर्थाने हा विषय लोकप्रियता मिळवण्याचे साधन ठरत आहे.
पडद्यामागचे सत्य पाहिल्यास काही जण ‘वन नाइट स्टँड’ला एवढे चटावलेले असतात की ते कपड्यांप्रमाणे दररोज नवनवीन लोकांकडून हुक अप करत असतात. यामागचे आणखी एक कारण पाहिले तर सोशल मीडियाचे कल्चर वाढल्यापासून लोक नात्यांना वेळ देण्यास तयार नाहीत. पूर्वी अनेक वर्षे जोडपी रिलेशनशिपमध्ये राहात असत आणि एकमेकांना बांधिल असत. नात्यांवरून त्यांचे संबंध लैला-मजनूप्रमाणे असायचे. आता लोक ‘वन नाइट स्टँड’ला प्राधान्य देतात. कारण यात एखाद्याबरोबर संपूर्ण आयुष्य व्यतित करण्याची गरज नसते. आजचे तरुण हे खुलेपणाने स्वत:साठी पर्याय निवडत आहेत. त्यांना एखादी व्यक्ती आवडली नाही तर तातडीने दुसरीकडे पाहात असतात. ‘वन नाइट स्टँड’ची गरज भागवण्यासाठी ऑनलाइन डेटिंग अॅप हे सर्वात सोपे प्लॅटङ्गॉर्म आहे. कारण यात बहुतांश युजर हे नॉन सीरियस रिलेशनशिपसाठी अकाउंट सुरू करणारे असतात. या व्यासपीठावरच्या लोकांचा ङ्गंडा अगदी स्पष्ट आहे. त्यांना कोणतेही आश्वासन न देता संबंध ठेवायचे आहेत. त्यांना संंबंधांतील डोकेदुखी नको असते.
अशा प्रकारे प्रस्थापित होणार्या संबंधात रडापड नाही आणि आयुष्यभर सोबत राहण्यासाठी वचनाची देवाणघेवाणही नाही. अनेक तरुण कमिटमेंट आणि ब्रेकअपपासून वाचण्यासाठी वन नाइट स्टँड करतात. जी मंडळी आपल्या आयुष्याला कंटाळलेले असतात, निराश असतात, ज्यांचे ब्रेकअप झालेले असते ते वन नाइट स्टँडला प्राधान्य देतात. मनासारखे घडले नाही तर ते उदिग्न होतात. अशावेळी ते नैराश्याच्या गर्तेत जातात आणि चिंताग्रस्त होतात. त्यामुळे आपण भारतीयांनी अशा घातक प्रवाहापासून अलिप्तच राहावे.