नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट अखेर आज प्रदर्शित होत आहे. शाहरुख खानबरोबर या चित्रपटात दीपिका पदुकोण व जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘पठाण’ चित्रपटाचं बेशरम गाणं प्रदर्शित झाल्यावर बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेसह काही भाजपा नेत्यांनी यावर आक्षेप घेतले होते. दरम्यान, आता विश्व हिंदू परिषदेने पुन्हा एकदा या चित्रपटाविषयी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे.
अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या भगव्या बिकिनीसह गाण्यातील काही वाक्यांवरही आक्षेप घेण्यात आले होते. या आक्षेपानंतर सेन्सॉर बोर्डाने चित्रपट निर्मात्यांना काही बदल सुचवले. या बदलानंतर बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने आता ‘पठाण’ चित्रपटाला विरोध करणार नसल्याचे म्हटले आहे.
“सध्या तरी विश्व हिंदू परिषद पठाण चित्रपटला विरोध करणार नाही. आमचे पूर्वीचे आक्षेप लक्षात घेऊन चित्रपटात केलेले बदल योग्य आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर आम्हाला काही आक्षेपार्ह वाटले तर आम्ही चित्रपटाला विरोध करण्याचा पुनर्विचार करू.” असे विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते श्रीराज नायर यांनी सांगितले आहे.
‘बेशरम रंग’ गाण्यामुळे पठाण बॉयकॉट ट्रेण्डमध्ये अडकला होता. परंतु, याचा चित्रपटावर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच अडव्हान्स बुकिंगमधून तब्बल २४ कोटींची कमाई शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाने केली आहे. तसेच देशभरात चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा दिला. देशात अनेक ठिकाणी या चित्रपटाच्याविरोधात पोस्टर-बॅनर फाडण्यात आले, तोडफोड करण्यात आली होती.
दरम्यान, आता या आज सकाळपासून या चित्रपटाचे स्क्रिनींग देशभरात सुरु आहे. त्यातच कुठे अनुचित प्रकार घडू नये म्हणून जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.