नवी दिल्ली – रिपब्लिक टीव्ही चॅनेलचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अटकेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गोस्वामी यांच्या अटकेची तुलना भाजपने आणीबाणीसोबत केली आहे. अशातच आता एका भाजप नेत्याने दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर आणीबाणी संदर्भात पोस्टर लावले होते.
भाजपाचे नेते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी चक्क दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर राज्यात आणीबाणी २.० चा लागल्याचा दावा करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं पोस्टर लावले होते. याच मुद्यावरून आता शिवसेना पक्षानं यावर सामना’च्या अग्रलेखातून भाजपच्या या पोस्टरबाजीवर भाष्य करताना प्रतिक्रिया दिली आहे.
काय आहे सामनाच अग्रलेख
तशीच अप्रतिष्ठा
महाराष्ट्रातील विरोधी पक्षाकडून कायद्याच्या बाबतीत सुरू आहे. आणीबाणीसारखी परिस्थिती कोण निर्माण करीत आहेत व अराजक कुणाला हवे आहे ते आता स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिमेचे आणि प्रतिष्ठेचे भंजन करण्याचे हे कारस्थान दिसत आहे. मनुष्यवधाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या संशयित आरोपीचा निकाल रस्त्यावर उतरून कसा काय होऊ शकतो? गुजरातमध्ये गोध्राकांड व इतर प्रकरणांत अमित शहांपासून अनेक भाजप नेत्यांना तत्कालीन सरकारच्या कारवाईस सामोरे जावे लागले. या सर्व कारवाया सूडाच्याच होत्या असे शहा यांचे म्हणणे असले तरी त्यासाठी भाजपने रस्त्यावर उतरून आंदोलने केली नाहीत व कायद्याला आव्हान देण्याचा प्रयत्न केला नाही. न्यायालयीन डावपेचातून श्री. शहा सुटले आहेत. तेव्हा तर श्रीमान मोदी हेच गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांनी तेव्हा संयम राखला, त्याचे फळ त्यांना मिळाले.\आज सदोष मनुष्यवधप्रकरणी सरकारवर, ज्यांचा मृत्यू झाला त्या नाईक कुटुंबावर अश्लाघ्य चिखलफेक करणाऱ्या टोळ्य़ांनी याचे भान राखले नाही तर अमेरिकेत ट्रम्प यांच्या बाबतीत घडले त्याची पुनरावृत्ती हिंदुस्थानात घडायला वेळ लागणार नाही. भाजपवाल्यांचे डोके इतके कामातून गेले आहे की, दिल्लीच्या रस्त्यांवर श्री. उद्धव ठाकरे व इंदिरा गांधी यांची पोस्टर्स चिकटवून आणीबाणीची आठवण लोकांना करून दिली जात आहे. हा बालिशपणा तर आहेच, पण अज्ञानसुद्धा आहे. इंदिरा गांधींशी तुलना होणे ही गौरवाचीच बाब आहे. ‘हिंदुस्थान’च्या फाळणीचा सूड याच पोलादी स्त्रीने पाकिस्तानची फाळणी करून घेतला.
असे धाडस
पाकिस्तानच्या बाबतीत एकाही ‘मर्द’ म्हणवून घेणाऱ्या राज्यकर्त्यास दाखवता आले नाही. आणीबाणीनंतर इंदिरा गांधींचा पराभव जरूर झाला, पण त्याच इंदिरा गांधींना देशाच्या जनतेने पुन्हा विजयी केले. देशाच्या अखंडतेसाठी इंदिराजींनी शेवटी प्राणाचे बलिदान दिले. असा दुर्दम्य त्याग नंतर एखाद्या तरी पंतप्रधानाने केला असेल तर दाखवा. त्यामुळे भाजपने दिल्लीच्या रस्त्यावर इंदिराजी व उद्धव ठाकरे यांचे एकत्र चेहरे लावले असतील तर त्याचे स्वागत आहे. यानिमित्ताने त्यांनी पाळण्यात बसून पुन्हा इतिहासाचे वाचन केले तर बरे होईल. म्हणजे सदोष मनुष्यवध प्रकरणातील आरोपीच्या समर्थनार्थ दंडास काळय़ा पट्टय़ा आणि पायांत गुलामीचे घुंगरू बांधून नाचायची वेळ येणार नाही. पंतप्रधान, राष्ट्रपती, लष्करप्रमुख, राज्यपाल अशा पदांवरील व्यक्तींचा एकेरी आणि ‘अरे-तुरे’च्या भाषेत जाहीर उद्धार केलेला भाजपला चालणार असेल तर त्यांनी तसे सांगावे. म्हणजे त्यांच्या दंडावरील काळय़ा पट्टय़ांचे आम्हीही स्वागत करू. अमित शहा, मोदी वगैरे नेत्यांशी मतभेद असू शकतात. म्हणून ‘एकेरी’वर जाऊन त्यांच्यावर चिखलफेक करणे आम्हाला मान्य नाही.