…तर आम्ही जबाबदारी घेऊ : उपमुख्यमंत्री पवार

प्रत्येकाचा जीव वाचावा, हाच आमचा प्रयत्न : पुण्यात आढावा बैठक


करोना साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

पुणे – करोना झालेल्या प्रत्येक बाधित ठणठणीत व्हावा. करोनामुळे कोणाचाही मृत्यू व्हावा असे वाटत नाही. प्रत्येकाचा जीव वाचला पाहिजे, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक व्यक्‍तीने प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

विधानभवन येथे पवार यांच्या उपस्थितीत करोना परिस्थितीवर आढावा बैठक झाली. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. ज्या गोष्टी आमच्या हातात नाहीत, त्याबद्दल आम्ही केंद्राकडे मदत मागत आहोत. जिल्ह्यात दररोज 1 लाख लसीकरणाची तयारी पूर्ण केली आहे. सध्या दिवसात 85 हजारांपर्यंत लसीकरण केले आहे. 

परंतु अन्य राज्यांतही करोनाची परिस्थिती गंभीर असून तेथेही लस पुरवठ्याची जबाबदारी केंद्र सरकारवर आहे. त्यामुळेच हापकिन इन्स्टिट्यूटमध्ये लसीचे उत्पादन करण्याची परवानगी राज्य शासनाने मागितली होती. केंद्र शासनाने तशी परवानगीही दिली असून, लवकरच हापकिन येथे करोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन सुरू होईल आणि पर्यायाने लसीकरणाचा वेग वाढेल.

…तर आम्ही जबाबदारी घेऊ
करोना काळात पंढरपूर विधानसभा निवडणुकीबाबत पवार म्हणाले, “या निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने लावल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या अखत्यारित स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारमधील निवडणुका येतात. मुख्यमंत्र्यांनी आयोगाला विनंती केल्यानंतर त्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. निवडणूक घरात बसून लढता येत नाही. तरीही पंढरपूर-मंगळवेढ्यात निवडणुकीनंतर करोनाचा प्रादुर्भाव झाल्यास आम्ही जबाबदारी घेऊ, पण पाच राज्यांतील परिस्थिती बिघडल्यास त्याची जबाबदारी ही केंद्राचीच असेल.’ उत्तराखंड कुंभमेळ्याच्या परिस्थितीला जबाबदार कोण? असा प्रश्‍नही पवार यांनी उपस्थित केला.

महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेबाबत पवार म्हणाले, “तुम्ही त्याचा विचार करू नका. पक्षातील वरिष्ठ शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी हे खंबीर आहेत. त्यामुळे या महाविकास आघाडीला नखाएवढाही फरक पडणार नाही.
– अजित पवार, उपमुख्यमंत्री

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.