…म्हणून सोनिया गांधी-शरद पवारांची आजची भेटही रद्द 

मुंबई – राज्यातील सत्ताकोंडी फोडण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये आज दिल्लीत महत्वपूर्ण बैठक रद्द झाली आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम असल्याने काँग्रेस नेते तिकडे व्यस्त असल्याने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी-राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची बैठक रद्द करण्यात आली आहे. ही बैठक उद्या होणार असल्याची शक्यता राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी वर्तवली आहे.

महाराष्ट्रातील सरकार स्थापनेविषयीच्या पेचावरील तोडगा म्हणून पाहिली जाणारी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील बहुचर्चित भेट सोमवारी झाली. मात्र, त्या भेटीनंतर पवार यांनी केलेली वक्तव्ये संभ्रम निर्माण करणारी ठरली. त्या वक्तव्यांतून पवार यांनी राजकीय गुगली टाकल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, त्यामुळे सरकार स्थापनेबाबतच्या सस्पेन्समध्ये आणखीच वाढ झाल्याचे चित्र पुढे आले आहे.

महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन नवी आघाडी बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. नव्या सरकारचा आधार म्हणून किमान समान कार्यक्रम निश्‍चित करण्यासाठी त्या पक्षांत मागील काही दिवसांत चर्चेच्या फेऱ्याही झाल्या. आता त्या कार्यक्रमावर सोनिया आणि पवार यांच्या भेटीत शिक्कामोर्तब होईल आणि नवी आघाडी स्थापण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी जोरदार चर्चा होती. त्यामुळे सोनिया-पवार भेटीकडे संपूर्ण महाराष्ट्राचेच लक्ष लागले होते. मात्र, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची भेट रद्द झाल्याने सत्ता स्थापनेचा पेच कधी सुटणार असा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित राहिला आहे.

दरम्यान, सोमवारच्या भेटीत किमान समान कार्यक्रमाबाबत सोनियांशी चर्चा झाली नसल्याचेही शरद पवारांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.