पुणे – पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात सोमवारपासून (20 फेब्रुवारी) एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु असून, आज या आंदोलनाचा चौथा दिवस आहे. गेल्या दोन महिन्यातील हे तिसरं आंदोलन आहे. जानेवारीच्या अखेरीस विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत सरकारनं नव्या परीक्षा पद्धतीची अंमलबजावणी पुढे ढकलली होती. मात्र, हा निर्णय घेऊन तीन आठवडे उलटले असूनसुद्धा या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान,विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला आतापर्यंत अनेक नेत्यांनी भेटी देत पाठिंबा दिला आहे. मंगळवारी रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील या उमेदवारांची भेट घेत आंदोलनस्थळावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
यावेळी पवार म्हणाले, ‘एका विद्यापीठाचे कुलगुरू मला भेटायला आले होते. एमपीएससीच्या अभ्यासक्रमामध्ये बदल केल्याची माहिती त्यांनी मला दिली. या बदलांविरोधात कृषी विद्यापीठातील हे परीक्षार्थी 26 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसात एक बैठक घेण्याचं आश्वासन दिले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत एमपीएससीचे अध्यक्ष आणि इतर प्रमुख अधिकारी उपस्थित असतील.’ असं शरद पवार यावेळी उमेदवारांना म्हणाले होते.
दरम्यान, आज विद्यार्थी शरद पवारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार होते. मात्र आजची ही भेट रद्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याने आजची भेट रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात भेट होणार होती. मात्र ही बैठक अचानक रद्द करण्यात आली. त्यामुळे आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.