…त्यामुळे रक्‍तदानाशिवाय पर्याय नाही!

अभिनेते राजपाल यादव : नानासाहेब शितोळे यांचा स्मृती दिन

सांगवी – आज विज्ञान तंत्रज्ञान इतके पुढे गेले असून, आपण सर्व क्षेत्रे पादाक्रांत केली आहेत. मात्र, विज्ञान अद्याप रक्ताचा एक थेंबही बनवू शकले नाही. त्यामुळे रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्त संकलित करण्याशिवाय पर्याय नाही. रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन अभिनेते राजपाल यादव यांनी केले.

पिंपरी-चिंचवडचे दिवंगत माजी महापौर नानासाहेब शितोळे यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त जुनी सांगवी येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. तसेच सामाजिक बांधिलकी जपत नव्याने सुरू करण्यात आलेल्या चॅम्पियन कराटे क्‍लबचे उद्‌घाटन अभिनेते राजपाल यादव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रामपाल यादव बोलत होते.

याप्रसंगी माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर मंगला कदम, दत्ता साने, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, अजय शितोळे, अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, चॅम्पियन कराटे क्‍लबच्या संचालिका दीपिका बोडेकर आदी उपस्थित होते. नानासाहेब शितोळे यांच्या स्मृती जागवत अजित पवार म्हणाले की, पिंपरी-चिंचवडचा जो विकास झाला आहे, या विकासात नानासाहेब शितोळे यांचे मोठे योगदान आहे. सर्व क्षेत्रातील लोकांना सोबत घेऊन काम करण्याची नानासाहेब शितोळे यांची हातोटी होती.

या रक्तदान शिबिरात पहिले रक्तदाते हेमंत खंडू गाडे यांचा अजित पवार यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. रक्तदान शिबिरात रक्त संकलन वायसीएम रुग्णालयाच्या रक्तपेढीने केले. सूत्रसंचालन स्वाती तोडकर यांनी, तर आभार गीता येरूणकर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)