विद्यार्थ्यांच्या पटसंख्येची माहिती अपडेट करण्याच्या सूचना
पुणे – शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांमधील विद्यार्थी संख्येची माहिती अपडेट नसल्यास संबंधित शाळा योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात येणार आहे, असे आदेश पुणे महापालिकेच्या प्रशासकीय अधिकारी मिनाक्षी राऊत यांनी शाळांच्या मुख्याध्यापकांना बजाविला आहे.
केंद्र व राज्य शासनाकडून पोषण आहार योजनेसाठी दरवर्षी निधी पुरविण्यात येतो. विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसारच शाळांना निधी पुरविण्याबाबतचे धोरण निश्चित केले आहे. शाळांना पटसंख्येची माहिती अपडेट करण्याबाबत अनेकदा सूचना दिल्या आहेत. मात्र, शाळांकडून त्याची अंमलबजावणीच केली जात नसल्याची बाब उघड झाली आहे.
जून 2016 मध्ये सरल पोर्टल अंतर्गत एम.डी.एम. पोर्टल सुरू केले आहे. योजनेचे प्रशासकीय कामकाज, अंदाजपत्रक व इतर अनुषंगिक कामांसाठी पटसंख्येची माहिती आवश्यक असते. प्रतिवर्ष शाळांची इयत्तानिहाय पटसंख्येमध्ये बदल होत असतो. त्यानुसार पोर्टलवर शाळांमधील पटसंख्येची माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे.
शाळांनी आपले एम.डी.एम. पोर्टल लॉगिन करून शाळेतील सद्यस्थितीतील पटसंख्येची माहिती अचूक भरण्यासाठी मुदत दिली होती. शाळेस पोषण आहाराचा पुरवठा करणाऱ्या बचतगट, संस्थांमार्फत कार्यालयाकडे माहिती सादर करण्याबाबत अनेकदा कळविले होते. बऱ्याचशा शाळांनी माहितीच भरलेली नाही. 5 जानेवारीपर्यंत पुन्हा माहिती भरण्यासाठी मुदतवाढ दिली होती. तरीही माहिती अपडेट न करणाऱ्या शाळांना योजनेचा फायदाच घेता येणार नाही. याची सर्वस्वी जबाबदारी शाळांवरच राहणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.