पुणे -“ऑस्ट्रेलियातील सिडनी एअरपोर्टच्या तिसऱ्या रन-वेचे काम मला मिळाले, तेव्हा तिथे देखील जुन्या पद्धतीप्रमाणेच काम केले जात होते. परंतु जेव्हा मी स्टील उत्पादनातील मळी रस्ते बांधण्यात कशी वापरता येईल हा विषय मांडला. तेव्हा त्यांनी मला संधी दिली. आज आपल्या देशात देखील अनेक ठिकाणी चांगले रस्ते होत आहेत. जर समाजभान राखून विचार केला, तर वेस्ट प्रॉडक्टपासून टिकाऊ आणि खड्डेविरहित रस्ते होऊ शकतात,’ असे मत रस्ते बांधणी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ डॉ. विजय जोशी यांनी व्यक्त केले.
डेक्कन येथील “विद्या महामंडळ संस्थे’च्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त “लोकशिक्षण दिन’ साजरा केला जातो. यावेळी आपटे प्रशालेच्यावतीने “पु. ग. वैद्य स्मृती पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन संस्थेच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी प्रशालेच्या ज्युनियर कॉलेजचे माजी विद्यार्थी तथा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अभय आपटे, कार्याध्यक्ष डॉ. अ. ल. देशमुख, कार्यवाह गीता देडगावकर आदी उपस्थित होते. “आज देशात रस्ते बांधणी सल्लागार म्हणून मी काम करत आहेच. परंतु त्याचे मूल्य कधीच घेतले नाही. कितीही पैसे कमावले तरी देखील शेवटी तुम्ही किती यशस्वी झालात हे महत्वाचे असते,’ असे डॉ. जोशी म्हणाले.
मी सामान्य कुटुंबातील असलो तरी उच्च ध्येय आणि समाजभानाचे संस्कार आई-वडिलांकडून मिळाले आणि ते जोपासण्याचे संस्कार प्रशालेकडून मिळाले. जर मी या प्रशालेत आलो नसतो तर या पदालादेखील पोहचू शकलो नसतो. पोलीस म्हणून काम करताना नकारात्मक गोष्टींना सामोरे जावे लागत असते. परंतु अशा सत्कारांमधून सकारात्मक उर्जा मिळते, असे डॉ. शिंदे यांनी नमूद केले.