वॉशिंग्टन – करोनावरील लस येत्या काही दिवसांत उपलब्ध झाली तरी जगाला धोका कायम राहणार असल्याचा दावा अमेरिकेतील संसर्गजन्य रोगतज्ज्ञ अँथोनी फॉसी यांनी केला आहे.
करोनाचा संसर्ग सहा महिने जसा होता तसाच कायम आहे. काही देशांत याचे प्रमाण कमी झाले असले तरीही त्यावर संपूर्ण नियंत्रण मिळविण्यात इतक्यात यश येणार नाही. उलट समूह संसर्गाचा धोकाच आता जास्त दिसत आहे. जगभरातील अनेक देशांत लस शोधण्यासाठी विविध पद्धतींनी संशोधन सुरु आहे. अनेक देशांनी येत्या काही काळात लस उपलब्ध होईल असेही सांगितले आहे. मात्र, अशी लस जरी हाती आली तरीही करोनाचा धोका पुढील अनेक महिने कायम राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
जगात करोनाचा धोका निर्माण झाल्यापासून अनेक स्तरांवर संशोधन सुरु आहे. काही देशांत आशादायक निकालही आले आहेत. मात्र, करोनावर संपूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी आणखी किमान एक वर्ष लागेल. करोनापूर्व काळाप्रमाणे जनजीवन सुरळीत होण्यासाठी खूप वेळ लागेल.
लस हाती आल्यावर जग पूर्वपदावर येईल असे अनेकांना वाटत आहे. मात्र, तसे होणार नाही उलट आणखी काळजी घ्यावी लागेल. कारण त्यावेळी लस आहे अशा समजातून करोनाबाबतच्या सूचनांची पायमल्ली होण्याचा धोका जास्त आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.