मुंबई – अमिताभ बच्चन आणि इम्रान हश्मीच्या “चेहरे’बाबत पहिल्यापासूनच खूप चर्चा व्हायला लागली होती. आता सिनेमा रिलीज व्हायची वेळ आली होती, म्हणून प्रमोशनसाठीही ही चर्चा सुरू होती. मात्र, आता हा सिनेमा बघण्यासाठी प्रेक्षकांना आणखी काही दिवस वाट बघावी लागणार आहे.
देशात, त्यातही महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढायला लागल्याने “चेहरे’चा रिलीज पुढे ढकलण्यात आला आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊन लागू झाल्यावर अनेक निर्मात्यांनी त्यांच्या सिनेमांचे रिलीज 2021 मध्ये करण्याचे ठरवले होते. त्यानुसार आता बरेच सिनेमे रिलीज व्हायला लागले आणि थिएटरही पुन्हा सुरू झाली आहेत. पण पुन्हा करोनाचे रुग्ण वाढायला लागल्यानंतर काळजी वाढायला लागली आहे.
उपाययोजना आणि निर्बंध यामुळे थिएटर पुन्हा काही दिवस बंद राहण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे “चेहरे’च्या निर्मात्यांनी रिलीज पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. इम्रान हश्मीने इन्स्टाग्रामवर ही माहिती दिली आहे. “आमच्या प्रेक्षकांची सुरक्षितता आमच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाची आहे. आमच सिनेमा तुम्ही लवकरच बघू शकणार आहात. तोपर्यंत सुरक्षित रहा.’ असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. “चेहरे’ 9 एप्रिलला रिलीज होणार होता. त्यामध्ये अन्नू कपूर, रिथिमान चॅटर्जी, रघुबीर यादव आणि रिया चक्रवर्ती हे देखील लीड रोलमध्ये दिसणार आहेत.