न्यूयॉर्क: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे नुकतेच करोनाच्या आजारातून बरे झाले आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. बुधवारी त्यांची जोडीदार कॅरी सायमंड्स यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला. या बाळाचे नाव जॉन्सन यांनी त्यांच्यावर करोनाचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या नावावरुन ठेवत अनोख्या पद्धतीने डॉक्टरांचे आभार मानले आहेत. सायमंड्स यांनीच यासंदर्भात सोशल नेटवर्किंगवरुन माहिती दिली.
विलफ्रड लॉरी निकोलस जॉन्सन असं या बाळाचे नाव असून निकोलस हे नाव जॉन्सन यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या नावावरुन ठेवण्यात आलं आहे. निक प्रिन्स आणि निक हार्ट असं जॉन्सन यांच्यावर उपचार केले. हे दोन्ही डॉक्टर संसर्गजन्य रोग आणि व्हेंटिलेटर्स स्पेशॅलिस्ट आहेत. बाळाच्या नावाबद्दल सायमंड्स यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट केली आहे.
It is hard to find the words to express my debt to the NHS for saving my life.
The efforts of millions of people across this country to stay home are worth it. Together we will overcome this challenge, as we have overcome so many challenges in the past. #StayHomeSaveLives pic.twitter.com/HK7Ch8BMB5
— Boris Johnson #StayHomeSaveLives (@BorisJohnson) April 12, 2020
विलफ्रड हे बोरिस यांच्या आजोबांचे नाव आहे. लॉरी हे माझ्या आजोबांचे नाव आहे. तर निकोलस हे डॉक्टर निक प्रिन्स आणि निक हार्ट यांच्या नावावरुन ठेवण्यात आलं आहे. याच दोन डॉक्टरांनी मागील महिन्यामध्ये बोरिसचे प्राण वाचवले,असं नावाचं स्पष्टीकरण सायमंड्स यांनी पोस्ट केलं आहे. ट्विटवरुनही त्यांनी नॅशनल हेल्थ सर्व्हिसमधील डॉक्टरांचे आभार मानले आहेत.
२७ एप्रिल रोजी पुन्हा सरकारच्या कोविड १९ विरोधी दलाची सूत्रे हाती घेणाऱ्या जॉन्सन यांनाही १२ एप्रिल रोजी डिस्चार्ज मिळाल्यानंतर डॉक्टरांचे आभार व्यक्त करणारा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यामध्ये त्यांनी माझे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानतो असं म्हटलं होतं.