पुणे – महापौर मुरलीधर मोहोळ यांना करोना संसर्ग झाल्याचे समोर आल्यानंतर आता महापालिका प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. मागील तीन दिवसांत महापौरांनी आरोग्य तसेच इतर काही विभागांच्या बैठका महापौर बंगल्यावर घेतल्या आहेत. या शिवाय, डॉक्टर डेनिमित्त त्यांनी दोन ठिकाणी कार्यक्रमांनाही उपस्थिती लावली होती. त्यामुळे आता महापौरांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चाचणी करण्यात येणार आहे.
शहरात करोनाचा पहिला बाधित सापडल्यापासून महापौर सातत्याने करोना नियंत्रणासाठी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत आहेत. त्यात अनेकदा त्यांनी रेड झोनसह नायडू रुग्णालयातही भेटी दिल्या आहेत. करोना रोखण्यासाठी ते सातत्याने आढावा बैठकाही घेत होते. महापौरांनी बुधवारी शहरातील रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट किटच्या चाचणीचे उद्घाटन नायडू रुग्णालयात केल्यानंतर त्यांनी महापौर बंगल्यावर करोनाची आढावा बैठक बोलाविली होती.
ही बैठक तब्बल चार तास सुरू होती. बैठकीस आयुक्त शेखर गायकवाड, साखर आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल, शांतनू गोयल, आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांच्यासह करोना नियंत्रणाची जबाबदारी असलेले पाच सहायक आरोग्य प्रमुख उपस्थित होते. तर गुरूवारी त्यांनी एका खासगी रुग्णालय तसेच नायडू हॉस्पिटलमध्ये डॉक्टर डेनिमित्त कार्यक्रमांना हजेरी लावली होती. तर, शुक्रवारी सकाळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आढावा बैठकीस हजेरी लावल्यानंतर सायंकाळी पालिका वैद्यकीय महाविद्यालयाच्या ट्रस्ट स्थापनेसाठीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी काही वैद्यकीय अधिकारी, विधी विभागाचे अधिकाऱ्यांचीही बैठक घेतल्याचे समोर आले आहे.