पिंपरी – कोविड 19 चा प्रादुर्भावामुळे अद्याप शहरातील शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. राज्यातील काही भागात 70 टक्के शाळा सुरू झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यात सुमारे 6 लाखांहून अधिक विद्यार्थी शाळेमध्ये उपस्थिती लावत आहेत. या धर्तीवर पिंपरी-चिंचवडमधील मनपा आणि खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा कार्यकर्ते संदीप काटे यांनी केली आहे.
शहरात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासक्रम शिकवण्यात येत आहे. विद्यार्थी शाळेत जात नसल्यामुळे त्यांचे वार्षिक शालेय शुल्क भरत नसल्यामुळे शाळा व्यवस्थापकांना शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन देणे अशक्य होत आहे. यावर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा व्यवस्थापकांनी तीन दिवसांचा बंद पुकारला होता. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा खर्च भागवण्यासाठी संस्थाचालकांना बॅंकेचे कर्ज घ्यावे लागत आहे.
संस्थाच्या मदतीसाठी प्रशासकीय स्तरावर हाचलाच होत नसल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे, अशी व्यथा काटे यांनी व्यक्त केली आहे. शहरात गेल्या महिनाभरात करोनाचा वेग मंदावला आहे. बाधितांची कमी होणारी संख्या पाहता राज्य सरकारने स्थानिक प्रशासनाच्या आदेशाने शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यामुळे सोशल डिस्टंन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करून शाळा सुरू करण्याची परवानगी द्यावी. ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे घरी बसून शिकणा-या विद्यार्थ्यांवर शिक्षकांचे नियंत्रण राहत नाही. त्याचा परिणाम शैक्षणिक वर्षावर पडण्याची शक्यता आहे.