…म्हणून सुशांतला चित्रपटांतून काढावं लागलं – संजय लीला भन्साळींनी पोलिसांना सांगितले कारण

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची काल चौकशी करत जबाब नोंदवून घेण्यात आला होता. ही चौकशी सुमारे तीन तास चालली. वांद्रे पोलिसांनी भन्साळी यांना समन्स बजावले होते. यानंतर संजय भन्साळी हे काल दुपारी साडेबाराच्या सुमारास चौकशीसाठी वांद्रे पोलीस ठाण्यात हजर झाले होते.

यानंतर दुपारी साडेतीन वाजेपर्यंत झालेल्या चौकशीत पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या चार चित्रपटांसाठी सुशांतला साइन केले होते. मात्र, ऐनवेळी त्याला चित्रपटातून काढून टाकण्यात आले. म्हणून सुशांत नैराश्‍यात गेला असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच याप्रकरणी संजय लीला भन्साळी यांची चौकशी करण्यात येत आहे.

दरम्यान, काल नोंदवून घेतलेल्या जबाबामध्ये संजय लीला भन्साळी यांनी सुशांतला ऐनवेळी चित्रपटातून काढून टाकण्यामागचे कारण सांगितले आहे. याबाबत एका इंग्रजी वृत्तसंकेतस्थळाने सुत्रांकरवी दिलेल्या वृत्तानुसार भन्साळी यांनी, ‘चित्रीकरण पूर्ण करण्याबाबत इतरांना शब्द दिला होता मात्र  सुशांत सिंग राजपूत याच्या चित्रीकरणासाठी तारखा मिळत नव्हत्या. त्यामुळेच त्याला ऐनवेळी काढून टाकावे लागले’ असा जबाब दिल्याचे म्हंटले आहे.

तत्पूर्वी, सुशांतने 14 जून रोजी आत्महत्या केली. त्यानंतर कलाविश्‍वात एकच खळबळ उडाली आहे. बॉलीवूडमधील घराणेशाहीला कंटाळून सुशांतने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच सध्या पोलीस यंत्रणा याप्रकरणी कसून चौकशी करत आहे. पोलिसांनी कलाविश्‍वातील अनेकांची चौकशी केली असून त्यात सुशांतसंदर्भातील अनेक गोष्टींची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी आतापर्यंत ३४ जणांचा जबाब नोंदविला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.