मुंबई – बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार बॉडी आणि अभिनयात माहीर असलेला सोनू सूद सध्याच्या कठीण काळातही लोकांच्या मनावर आधिराज्य करत आहे. सोनूने अलीकडे आपले जुहूमधील हॉटेल करोनाविरोधात दिवसरात्र काम करत असलेल्या डॉक्टर, परिचारिका आणि पॅरा मेडिकल स्टाफसाठी उघडले होते. त्यानंतर तो दररोज सुमारे 45,000 हून अधिक गरजू लोकांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करीत आहे. 25 हजारांहून अधिक लोकांना फूड किट वाटप करणार आहे.
तर यातच सोनू सूदने स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची मोहिम हाती घेतली आहे. “शेवटचा स्थलांतरित मजूर घरी पोहचेपर्यंत मी ही घर भेजो मोहीम सुरु ठेवणार आहे,” असं सांगणारा सोनू सध्या बराच चर्चेत आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत त्याने हजारो मुजरांना आपल्या राज्यामध्ये परत पाठवलं आहे. याच संदर्भात सोनूला दिवसाला किती मेसेज येत असतील?, तो झोपतो की नाही?, तो दिवसातून किती तास काम करतो? हे आणि असे अनेक प्रश्न त्याला त्याचे चाहते ट्विटवरुन विचारत आहेत.
या प्रश्ननांवर सोनू म्हणतो, “स्थलांतरितांबद्दल चौकशी करण्यासाठी रोज मला फोन येतात आणि आज किती लोकांना पाठवणार आहात असं विचारलं जातं. मला दिवसाला देशभरातून ५६ हजारहून अधिक मेसेज येत आहेत. हे आव्हानात्मक आहे पण काम करताना आनंद मिळत आहे. देव काय काय शिकवतो आणि काय काय काम करुन घेतो आपल्या हातून. खरचं हे खूप छान आहे. मला देशभरातील लोकांकडून प्रेम मिळत आहे,” अशा शब्दांमध्ये सोनूने आपल्या भावना व्यक्त केल्या.