अलिकडेच वाल्मिकी समाजाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सोनाक्षी सिन्हा अडचणीत सापडली आहे. एका मुलाखतीदरम्यान सोनाक्षीने एकदा विमानतळावरील स्वतःच्याच लुकचे वर्णन “भं…’ असे केले होते. मात्र तिने केलेल्या शब्दाचा वाल्मिकी समाजाकडून तीव्र धिक्कार केला गेला. सोनाक्षीने देखील वाद वाढणार नाही, अशी काळजी घेऊन सोशल मिडीयावरून वाल्मिकी समाजाची माफी मागितली आहे.
23 जुलैला एका इंटरव्ह्यू दरम्यान सिद्धार्थ करणने तिला एअरपोर्टवरच्या लुकबाबत प्रश्न केला होता. त्यावर तिने हे आक्षेपार्ह विशेषण वापरले होते. संतप्त वाल्मिकी समाजाच्या प्रतिनिधींनी उत्तर प्रदेशातल्या मोरादाबादमध्ये सोनाक्षीच्या प्रतिमेचे दहनही केले होते. सोशल मिडीयावरून दिलेल्या माफीनाम्यामध्ये सोनाक्षीने आपल्याला वाल्मिकी समाजाबाबत आणि या समाजाने दिलेल्या योगदानाबाबत पूर्ण आदर असल्याचे म्हटले आहे. आपल्या वक्तव्यामुळे जर कोणी दुखावले असेल, तर आपण दिलगीर आहोत, असे तिने म्हटले आहे.
सोनाक्षीने मध्यंतरी आपल्या चाहत्यांची एक फिरकी घेतली. हातकड्या घातलेल्या सोनाक्षीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. तिला का अटक झाली असावी, यावरून सोशल मिडीयावर खूप चर्चा रंगली. अखेर सोनाक्षीने याबाबत स्पष्टिकरण दिले. हा व्हिडीओ एका ब्युटी प्रॉडक्टच्या जाहिरातीसाठी केलेला होता, हे नंतर उघड झाले. गरजेपेक्षा जास्त सुंदर दिसल्याबद्दल सोनाक्षीला अटक केली गेली, असे या जाहिरातीत दर्शवले आहे.
सोनाक्षीचा सर्वात अलिकडचा “खानदानी शफाखाना’मध्ये लैंगिक संबंधांबाबत खुलेपणाने चर्चा घडवून आणली गेली आहे. लैंगिक विषयांबाबत आतापर्यंत उघडपणे न बोलले गेलेले मुद्दे व्यापक चर्चेद्वारे बोलण्याचा प्रयोग या सिनेमातून केला गेला आहे. विश्लेषकांनी सिनेमाच्या मूळ हेतूचे खूप कौतुक केले आहे. मात्र तरिही पूर्ण क्षमतेने विषयाची मांडणी केली गेली नाही, हा आक्षेपही आहे.