बुधवार पेठेतील घटना ः तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे – हॉटेलचा पत्ता सांगितला नाही म्हणून एका तरुणावर एअर गनने फायर करण्यात आले. यानंतर स्कॉर्पिओ कारमधून तिघे पसार झाले. ही घटना बुधवार पेठेत शुक्रवारी पहाटे घडली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे.
फिर्यादी सनी चौधरी (17, रा.इंदिरानगर, बिबवेवाडी) हा हॉटेलमध्ये जेवण करुन घरी चालला होता. यावेळी पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ त्याच्याजवळ थांबली. त्यामधील चालक व इतर तिघांनी त्याला प्यासा हॉटेल कोठे आहे याची विचारणा केली. त्याने पहिले मला माहिती नाही, असे सांगितले. मात्र, नंतर त्याने प्यासा हॉटेल कोठे आहे हे दाखविले. याचा राग मनात धरून त्याला शिवीगाळ व हाताने मारहाण करण्यात आली. यानंतर त्यातील एकाने एअर पिस्तूल काढून त्याच्या पायावर फायर केले. यामध्ये त्याच्या उजव्या व डाव्या पायाला जबर दुखापत झाली आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक वाय.पी.सुर्यवंशी करत आहेत.
पायावर एअर गनने केले फायर यासंदर्भात माहिती देताना सुर्यवंशी यांनी सांगितले, फिर्यादी वरातीतील घोडे फिरवायचे काम करतो. जेवण झाल्यानंतर तो बुधवार पेठ परिसरात फिरत होता. यावेळी स्कॉर्पिओतील व्यक्तींनी त्याला प्यासा हॉटेल कोठे आहे, अशी विचारणा केली. त्याने माहिती नसल्याचे सांगितल्यावर त्याला इतक्या रात्री तुला घरी जायला रिक्षा भेटणार नाही, तुला गाडीतून सोडतो असे सांगत गाडीत बसवले. दरम्यान त्याला दारु पाहिजे कोठे मिळेल अशी विचारणा केली. तेव्हा त्याने आरोपींना प्यासा हॉटेलजवळ नेले. आरोपींनी त्याला पैसे देऊन दारु आणायला लावली. फिर्यादी व आरोपींनी गाडीत दारू पिली. यानंतर फिर्यादीला घरी सोडण्यासाठी गाडी निघाली. यावेळी गाडीतील एकाने त्याच्या कानाखाली वाजवून आधी प्यासा हॉटेलचा पत्ता का सांगितला नाही अशी विचारणा केली.