…’त्यामुळे’ रेणू शर्माने धनंजय मुंडेंविरोधातील तक्रार मागे घेतली ; उमा खापरेंचा मोठा खुलासा

मुंबई : राष्ट्रवादीचे बडे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार रेणू शर्मा यांनी नुकतीच मागे घेतली आहे. तक्रार मागे घेतल्याने धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. रेणू शर्मांनी तक्रार मागे घेतल्याने अनेक चर्चांना उधाण आले होते. अशातच धनंजय मुंडे यांनी तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकल्यानेच त्यांनी तक्रार मागे घेण्याचा निर्णय घेतला, असा गौप्यस्फोट भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी केला आहे.

धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांनी राज्यभरात एकाच गोंधळ उधळा होता. गायक रेणू शर्मा यांनी मुंडे यांच्याविरोधात शारिरिक छळाचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. खुद्द सामाजिक न्यायमंत्र्यांवरच बलात्काराचा आरोप झाल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. होता. मात्र आज सकाळी रेणू शर्मा यांनी कौटुंबिक कारणास्तव आपण ही तक्रार मागे घेतोय, असे पोलिसांना सांगितले. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.

कौटुंबिक वादातून मी त्यांच्याविरोधात तक्रार दिली होती. परंतु आता मी ही तक्रार मागे घेते आहे, असं रेणू शर्मा यांनी पोलिसांनी सांगितलं. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिलं आहे. डीसीपी अभिषेक त्रिमूखे यांनी संबंधित तरुणीने तक्रार मागे घेतल्याचं सांगितलं.

रेणू शर्मा यांनी जरी तक्रार मागे घेतली असली तरी भाजपने मात्र यासंदर्भात धनंजय मुंडे यांच्यावर दबावाच्या राजकारणाचा आरोप केला आहे. अगोदरपासून तिच्यावर तक्रार मागे घेण्यासंबंधी दबाव होता. आता तिने ही तक्रार मागे घेतली आहे. आम्हाला याचं आश्चर्य वाटत नाही. आमचा मुद्दा हा आहे की धनंजय मुंडे यांनी प्रतिज्ञापत्रात दुसऱ्या बायकोचा उल्लेख तसंच तिच्यापासून झालेल्या दोन मुलांचा उल्लेख केला नाही ते कायद्याच्या परिघाबाहेर आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी प्रतिक्रिया उमा खापरे यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.