मॉस्को – रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आपल्याला हवेत तसे बदल आतापर्यंत वेळोवेळी करून घेतले आहे. देशाच्या सत्तेवर त्यांनी आपली पकड मजबूत केलेलीच आहे. त्यातच आता मंगळवारी एका नव्या कायद्याला त्यांनी मंजुरी दिली.
त्यानुसार आता राष्ट्राध्यक्षपदावरुन पायउतार झाल्यानंतरही व्लादिमीर पुतीन यांच्यावर कोणताही खटला दाखल केला जाऊ शकत नाही किंवा त्यांना अटक करण्यासही मज्जाव असेल. या कायद्यामुळे पुतीन यांच्या अमर्याद सामर्थ्यात आणखीनच वाढ झाली आहे.
थोडक्यात या कायद्यामुळे व्लादिमीर पुतीन यांना कोणत्याही गुन्ह्यापासून आजीवन संरक्षण मिळेल. तसेच एखादा गुन्हा किंवा गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी व्लादिमीर पुतीन यांच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली जाऊ शकत नाही, अशी तरतूद या कायद्यात आहे. पुतीन कुटुंबीय कोणत्याही कायद्याच्या अखत्यारित येणार नाहीत. रशियन सरकारकडून मंगळवारी हे विधेयक ऑनलाइन माध्यमांवर प्रकाशित करण्यात आले.
व्लादिमीर पुतीन रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतरही ते आजन्म सिनेटर राहतील. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हेगारी खटला चालवता येणार नाही.
वीस वर्षांपासून रशियात पुतीन यांची सत्ता
यंदा रशियात जनमत चाचणीद्वारे संविधानात संशोधन करण्यात आले. त्यामुळे व्लादिमीर पुतीन यांचा 2036 पर्यंत राष्ट्राध्यक्षपदी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुतीन यांनी सन 2000 मध्ये रशियाची सूत्रे हाती घेतली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्राध्यक्षपदावरील आपली पकड कधीही ढिली होऊन दिलेली नाही.
काही दिवसांपूर्वीच व्लादिमीर पुतीन यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे पुतीन राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा देतील, अशी चर्चा होती. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता ही शक्यता पूर्णपणे फोल ठरल्याचे दिसत आहे.
पुतीन यांना पार्किन्सनचा आजार झाल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी रंगली होती. त्यामुळे पुतीन 2021 मध्ये राष्ट्राध्यक्षपद सोडणार असल्याच्या चर्चा रशियात सुरु आहेत. मात्र, अद्याप या सगळ्याची अधिकृतरित्या पुष्टी होऊ शकलेली नाही.