दोन दिवसांत घर ते घर सर्वेक्षणात 8,200 कुटुंबांमध्ये आढळले 361 संशयित
शिरूर (पुणे)-माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत शिरूर शहरात गेल्या दोन दिवसात सुमारे 8 हजार दोनशे कुटुंबांतील 30 हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. 361 संशयित नागरिकांची करोना तपासणी करण्यात आली, त्यात 33 जण करोना पॉझिटिव्ह आढळले असल्याचे शिरुर नगरपरिषद मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
तपासणीकरिता आलेले शहरातील नामांकित डॉक्टर, लॅब टेक्नीशियन, शिक्षक, नगरपरिषद कर्मचारी, अंगणवाडी सेविका मदतनीस, शहरातील स्वयंसेवक महिला पुरुष तरुण या सर्वांना शिरूर नगर परिषदेच्या वतीने या मोहिमेत जीवाची परवा न करता सहभाग घेतल्याबद्दल करोना योद्धा म्हणून प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
करोना संसर्गजन्य रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत शिरूर येथे गेले दोन दिवसांत नागरिकांची टेंपरेचर व ऑक्सीजन तपासणी आमदार अशोक पवार, शिरूर नगर परिषद सभागृहनेते प्रकाश धारिवाल, प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख तहसीलदार लैला शेख, शिरुर नगर परिषद नगराध्यक्षा वैशाली वाखारे, मुख्याधिकारी महेश रोकडे, आरोग्य तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र शिंदे, शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यामध्ये 278 शिक्षक, दोन ते तीन कर्मचारी असलेल्या 132 टीम, 10 वॉर्ड ऑफिसर, 10 सहाय्यक ऑफिसर, 5 फ्ल्यू हॉस्पिटल त्यामध्ये 10 डॉक्टर, 5 लॅब टेक्निक, 5 नोडल अधिकारी, 5 सहायक नोडल अधिकारी अशा सुमारे 500 कर्मचारी यांनी शिरूर शहरातील वेगवेगळ्या भागांत नागरिकांच्या घरोघरी जाऊन तपासणी केली. त्यामध्ये सौम्य लक्षणे आढळलेल्या नागरिकांना फ्ल्यू हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या माध्यमातून औषध उपचार करण्यात आले.
- पाच ठिकाणी फ्ल्यू क्लिनिक
या दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील नागरिकांनी व सर्व व्यवसायिकांनी दुकाने बंद ठेवून नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीला उस्फूर्त प्रतिसाद दिला. शिरूर शहरातील मुंबई बाजार येथील शाळा, लाटेआळी येथील शाळा, शिरूर ग्रामीण रुग्णालय, शिरूर नगरपालिका नवीन प्रशासकीय इमारत या पाच ठिकाणी फ्ल्यू क्लिनिक सुरू करण्यात आले होते.