…म्हणून जनतेचा मोदी सरकारवर विश्‍वास – नितीन गडकरी

नारायणगाव – कॉंग्रेस व राष्ट्रवादी हे घोटाळेबाज सरकार असल्यामुळे जनतेने मोदी सरकारवर विश्वास टाकला. मोदी सरकारच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात जास्तीतजास्त निधी देण्यात आला. 5 लाख कोटींची रस्त्यांची कामे महाराष्ट्रात सुरु आहेत. देहू आळंदी, पैठण, शेगाव व पंढरपूरकडे वारकऱ्यांना पालखी मार्गाने जाण्यासाठी 8 हजार कोटींचा रस्ते प्रकल्प मंजूर केला आहे, अशी माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या प्रचारसभेत गडकरी बोलत होते. यावेळी खासदार आढळराव, आमदार शरद सोनवणे, आशा बुचके, सरपंच योगेश पाटे, नगराध्यक्ष शाम पांडे, सभापती ललिता चव्हाण, अर्चना माळवदकर, दिलीप बामणे, माउली खंडागळे यांसह मान्यवर उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, आढळराव हे उत्कृष्ट संसदपटू असून भाजप-शिवसेना सरकारच्या काळात अनेक विकास कामे केली आहे. खेड ते सिन्नर बाह्यवळणाचे काम महामार्गाचे काम शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतर न होणे व ठेकेदार कंपनीचा प्रॉब्लेम झाल्याने रखडले होते. हे प्रलंबित काम 23 मेनंतर सुरु होणार आहे. कळंब, खेड, मंचर, आळेफाटा या रस्त्यांसाठी नवीन ठेकेदार नेमून काम सुरु करणार आहे. आढळराव यांनी आपल्या मतदारसंघातील विकासकामासाठी अनेकवेळा संसदेत प्रश्न उपस्थित करून निधी मिळविला आहे. तळेगाव शिक्रापूर रस्ता मंजूर झाला आहे.

आढळराव म्हणाले, टीकाटिप्पणीमध्ये जास्त वेळ गेला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या चार खासदारांच्या तुलनेत शिरूर मतदारसंघात जास्त विकासकामे केलेली आहेत. गडकरी यांची भूमिका रस्ते व निधी देण्यासाठी सकारात्मक राहिली आहे. अष्टविनायक जोड रस्ता, इतर धर्मस्थळांना जोडलेले रस्ते, पुणे-नाशिक महामार्ग, शिवनेरी किल्ला विकास, तसेच तुळापूर व वढू या संभाजीराजाच्या भूमीसाठी 135 कोटीचा आराखडा मंजूर केला आहे. ट्रॅफिकची खरी समस्या कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या काळात होती. बैलगाडा शर्यतीला यांनी खो घातला व बदनाम मला करीत आहेत, कुठे फेडाल ही पापे? जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका म्हणून घोषित झाला आहे. अष्टविनायकाना जोडणाऱ्या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. विरोधकांना मी केलेली विकासकामे माहीत असून मतदानाची तारीख जवळ येत आहे, तसा नागरिकांचा मला मिळणार पाठिंबा पाहून त्यांची पायाखालची वाळू सरकली आहे. यावेळी शरद चौधरी, आशा बुचके, योगेश पाटे यांची भाषणे झाली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.