आयुक्त श्रावण हर्डीकर : जुने प्रकल्प वेळेत पूर्ण न केल्यास खर्च वाढतो
पिंपरी – यावर्षी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंदाजपत्रकात आयुक्तांनी नवीन मोठ्या प्रकल्पांची घोषणा केली नाही. याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले आहे की, नवीन मोठ्या प्रकल्पांची घोषणा केली नसली तरी जे प्रकल्प सुरू आहेत तेच प्रकल्प पूर्ण करण्यावर भऱ दिला जाणार आहे. जुने प्रकल्प मुदतीत पूर्ण झाले नाहीतर त्याचा खर्च वाढतो.
अंदाजपत्रकाबाबत आयुक्त म्हणाले, पिंपरी चिंचवड शहराचा विस्तार होत आहे. शहराला या वर्षी 50 वर्ष पूर्ण होत आहे. भविष्यामध्ये पिंपरी चिंचवड शहर हे सर्वाधिक पसंतीचे शहर होणे आवश्यक आहे. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. नागरिकांना केंद्रस्थानी मानून त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. शहराकडे अधिकाधिक नागरिक आकर्षित झाले पाहिजे. नागरिकांना शहरामध्ये आल्यानंतर मुबलक सोयी-सुविधा मिळाल्या पाहिजेत.
जेवढे नागरिक शहरात येतील तेवढे प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्यासाठी सार्वजनिक दळणवळणाची सुविधा सक्षम करणे आवश्यक आहे. त्यामध्ये जर मागे पडलो तर रस्त्यावर खासगी वाहनांची गर्दी वाढेल. त्यामुळे प्रदूषण व गर्दीमध्ये वाढ होईल. त्यातून शहराचा राहणीमानाचा दर्जा खालावेल. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक सुधारण्यावर भर दिला जाणार आहे. बीआरटी, मेट्रो, नियो मेट्रो यापर्यंत नागरिकांना पोहचण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी ई सायकल, ई बाईक यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
पाणी दरवाढ क्रमप्राप्त
सुरळीत पाणीपुरवठा करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी नागरिकांच्या अतिरिक्त पाणी वापरावर निर्बंध घालणे आवश्यक आहे. त्यासाठी पाणी दरवाढ करणे क्रमप्राप्त आहे. यामधून महापालिकेच्या उत्पनात वाढ होणार आहे. गरीबांना चांगले राहण्यायोग्य शहर बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या अंदाजपत्रकात कुठल्याही मोठ्या प्रकल्पांची घोषणा न करता मूलभूत सोयी-सुविधांवर भर दिला जाणार आहे. पर्यावरण, आरोग्य, वैद्यकीय यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. शहराच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण होत असताना शहर वैभवशाली आणि संपन्न बनविण्याचे भाग्य मिळत आहे.
– श्रावण हर्डीकर, मनपा आयुक्त.