…म्हणून मायावतींकडून भाजपच्या बाजूने मतदान करण्याचे ‘व्हीप’

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा आरोप

जयपूर – सचिन पायलट यांच्या बंडानंतर राजस्थानात सुरु झालेला सत्तासंघर्ष थांबण्याचं नाव घेत नाहीये. एकीकडे पायलट यांनी, गेहलोत सरकार अल्पमतात असल्याचा आरोप केलाय तर दुसरीकडे गेहलोतांनी शक्तिप्रदर्शन करत सरकारकडे पुरेसं संख्याबळ असल्याचं सांगितलंय. गेल्या २० दिवसांहून अधिक काळ सुरु असलेल्या या राजकीय घडामोडींमध्ये बहुजन समाज पक्षाचं नाव देखील सातत्याने घेतलं जातंय.

यामागचं कारण असं की, बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर राज्यात निवडून आलेल्या ६ आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राज्यातील काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत बंड उभे झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदाराने बहुजन समाज पक्षाच्या आमदारांचा काँग्रेसमधील प्रवेश पक्षबंदी कायद्याचे उल्लंघन करणारा असल्याची याचिका राजस्थान उच्च न्यायालयात दाखल केली होती.

यानंतर अशीच एक याचिका बसपातर्फे देखील दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने याबाबत सुनावणी करताना संबंधित आमदारांसह विधानसभा अध्यक्षांना कारणे दाखवा नोटीस धाडले आहे. अशातच बसपाने बहुमत चाचणी वेळी भाजपच्या बाजूने मतदान करण्याचे व्हीप आमदारांना बजावले आहे.

दरम्यान, बसपाच्या या भूमिकेवरून आज अशोक गेहलोत यांनी मायावती यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणतात, “बेहन मायावतीजी या सीबीआय व एडी कारवाईच्या भीतीमुळे दबावाखाली आहेत. बसपामधून काँग्रेसमध्ये सामील झालेल्या त्या ६ आमदारांचा प्रवेश कायद्याच्या चौकटीत राहूनच झाला आहे. जेव्हा राज्यसभेमध्ये तेलगू देसम पक्षाचे ४ खासदार भाजपमध्ये सामील झाले तेव्हा तर कुणी याबाबत बोललं नाही.”

Leave A Reply

Your email address will not be published.