….म्हणून ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्री होण्याचा अधिकार नाही; भाजपने दर्शवला विरोध

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. तृणमूल काँग्रेसने २१३ जागा जिंकल्या असून, ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा बंगालच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहे. मात्र ममतांच्या मुख्यमंत्री होण्याला भाजपाने विरोध केला आहे. भाजपाचे त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांनी ममतांना मुख्यमंत्री होण्याचा नैतिक अधिकार नसल्याचं सांगत विरोध दर्शविला आहे.

पश्चिम बंगाल विधानसभेच्या २९४ जागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. रविवारी निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. निकालाने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचं वर्चस्व कायम असल्याचं सिद्ध झालं. ममतांच्या तृणमूल काँग्रेसने २१३ जागा जिंकल्या असून, सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत. ममतांच्या मुख्यमंत्री होण्याला भाजपाचे त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांनी विरोध केला आहे.

“निवडणूक न लढवता अनेकजण मुख्यमंत्री बनले आहेत, पण ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधून निवडणूक लढवली आणि त्या पराभूत झाल्या. लोकांनी त्यांना निवडून दिलेलं नाही. त्यामुळे नैतिकतेच्या आधारावर ममतांनी स्वतःला मुख्यमंत्री पदापासून स्वतःला दूर ठेवावं. त्यांच्याविरुद्ध कटकारस्थान रचल्याचा दावा आता ममता बॅनर्जी करत आहेत. त्यांचा पराभव हा कट होता, तर निवडणुकीतील विजयामागेही कटकारस्थान आहे का?,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आगरातळा येथील भाजपाच्या मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना देव यांनी ममतांच्या मुख्यमंत्री होण्याला विरोध दर्शविला आहे. त्याचबरोबर निकालानंतर घडलेल्या हिंसाचारावरून ममतांवर आरोप केले आहेत. “काही राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला आहे. पण, भाजपाच्या मतांच्या टक्केवारीमध्ये अनेक पटींनी वाढ झाली आहे,” असे मुख्यमंत्री देव म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.