नवी दिल्ली – आमची भूमिका देशातील उद्योगाचे हितरक्षण करण्याची आहे. जर भारतातील उद्योगावर नकारात्मक परिणाम होत नसेल तरच भारत इतर देशातून भारतात होणार्या आयातीवरील आयात शुल्क कमी करण्याच्या शक्यतेवर विचार करेल असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
अमेरिकेच्या अध्यक्षपदावर डोनाल्ड ट्रम्प यांची नियुक्ती झाल्यानंतर या विषयावर चर्चा वाढली आहे. भारत आयात – निर्यात शुल्काचा सर्वात जास्त दुरुपयोग करणारा देश आहे. त्यामुळे भारताने जर अमेरिकन वस्तूच्या आयातीवर शुल्क लावले तर अमेरिका भारताच्या अमेरिकेत होणार्या आयातीवर शुल्क लावेल असे ट्रम्प यांनी अनेक वेळा बोलून दाखविले आहे. यासंदर्भात वृत्त माध्यमांनी सितारामन यांची प्रतिक्रिया मागितली असता सितारामन यांनी सांगितले की, जर आमच्या उद्योगावर परिणाम होत नसेल तरच आम्ही आयात शुल्क कमी करण्याच्या शक्यतेवर विचार करू.
भारताच्या या अगोदरच्या भूमिकेत काही प्रमाणात मवाळपणा आला असल्याचे या विधानातून सुचित होते असे काही विश्लेषकांनी म्हटले आहे. आम्ही विविध बाबीवर का आयात शुल्क लावले आहे याचे स्पष्टीकरण करू शकतो. भारतीय कंपन्यांचे हितरक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही अशा प्रकारचे निर्णय वेळोवेळी घेतलेले आहेत. देशातील मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातची उत्पादकता वाढावी, त्याचबरोबर आवश्यक गोष्टीची आयात व्हावी यासंदर्भात आम्ही संतुलन राखण्याचा प्रयत्न करीत असतो.
भारत आणि अमेरिकेदरम्यानचा व्यापार 119 अब्ज डॉलरचा आहे. तो भारताच्या बाजूने झुकला असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी भारताला आयात शुल्क कमी करण्याच्या सूचना या अगोदर अध्यक्ष असताना केल्या होत्या. आता पुन्हा ट्रम्प अध्यक्ष होणार आहेत. त्यामुळे ते भारताबाबत काय भूमिका घेतील याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.