…तर त्या तिघांना स्थानबद्धतेतच ठेवणे चांगले-जितेंद्र सिंह

जम्मू : काश्‍मीर खोऱ्यातील शांततेसाठी हातभार लागणार असेल तर त्या तिघांना स्थानबद्धतेतच ठेवणे चांगले, अशी टिप्पणी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी शुक्रवारी केली. सिंह यांना अभिप्रेत असणारे ते तिघे म्हणजे फारूक अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती हे जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री होत.

जम्मू-काश्‍मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने 5 ऑगस्टला घेतला. त्यानंतर त्या राज्यात कुठले अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली किंवा स्थानबद्ध करण्यात आले. त्याला तीन माजी मुख्यमंत्रीही अपवाद ठरले नाहीत. अटक किंवा स्थानबद्ध करण्यात आलेल्या नेत्यांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे.

त्यापार्श्‍वभूमीवर, सिंह यांच्या वक्तव्याला महत्व आहे. ते येथे सरकारी अधिकाऱ्यांच्या परिषदेत बोलत होते. जम्मू-काश्‍मीरच्या विकासासाठी आणि तिथे सुशासन देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. युवकांवर लक्ष केंद्रीत करून विकासावर भर दिला जाणार आहे, अशी ग्वाहीही सिंह यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.