…म्हणून पायलट यांचे बंड मोडणे काँग्रेससाठी महत्वाचे

जयपूर – राजस्थानचे उपमुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नव्या फळीतील नेते सचिन पायलट यांच्या दाव्यामुळे काल राष्ट्रीय राजकारणात एकच खळबळ उडाली होती. काँग्रेसने राजस्थानातील सत्ता काबीज केल्यापासूनच गेहलोत व पायलट यांच्यामध्ये ‘नंबर १’वरून वाद असल्याची वृत्तं वारंवार समोर येत होती. मात्र काल स्वतः पायलट यांनी आपल्याकडे ३० आमदारांचा पाठिंबा असून राजस्थान सरकार अल्पमतात असल्याचा दावा करत हा वाद चव्हाट्यावर आणला होता.

पायलट यांच्या या दाव्यामुळे आता राजस्थानमध्ये देखील मध्य प्रदेशात घडलेल्या राजकारणाची पुनरावृत्ती होईल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र आज मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे त्यांचे ‘हात’ मजबूत असल्याचं दिसतंय. याखेरीज पायलट यांनी ३० आमदारांचा पाठिंबा असल्याचा केलेला दावा देखील आजच्या चित्रामुळे फोल ठरला आहे.

मुख्यमंत्री गेहलोत यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनातील आकडेवारीमुळे बंडाची भाषा करणाऱ्या सचिन पायलट यांच्याकडे केवळ १० आमदारांचा पाठिंबा असल्याचं स्पष्ट झालंय. असं असलं तरी काँग्रेस नेतृत्वाने याबाबत सावधगिरीची भूमिका बाळगली असून पायलट यांनी बंडाची भाषा सोडल्यास काँग्रेस त्यांना पुन्हा स्वीकारण्यास तयार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

राजस्थानातील राजकीय पेच सोडवण्यासाठी काँग्रेसतर्फे नेमण्यात आलेल्या सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत पायलट यांनी संवाद साधावा असं आवाहन केलं आहे. यासोबतच त्यांनी, ‘पायलट यांच्यासाठी पक्षाची दारं उघडी आहेत’ हा पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचा संदेश असल्याचंही म्हंटलंय.

आज जरी मुख्यमंत्री गेहलोत हे संख्याबळ दाखवण्यामध्ये यशस्वी झाले असले तरी पायलट यांच्या बंडाला भाजपचे पाठबळ मिळाल्यास काँग्रेस समर्थक अपक्ष आमदार त्यांच्या गळाला लागतील अशी शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच पायलट यांचे बंड मोडून त्यांना पुन्हा पक्षात घेण्याचा पवित्र काँग्रेसतर्फे घेण्यात आल्याचं बोललं जातंय.

आज घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे मुख्यमंत्री अशोक गेहलोत फ्रंटफूटवर आल्याचं दिसत असलं तरी सचिन पायलट यांची पुढील राजकीय भूमिका काय असेल यावरूनच राजस्थानातील राजकारणाची पुढील दिशा ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.