…म्हणून भारत पहिल्या अंतराळ मोहिमेसाठी सज्ज होतोय

इस्रोचे माजी संचालक डॉ. सुरेश नाईक यांचा “साई’ पुरस्काराने सन्मान

पुणे – “भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा जेव्हा अंतराळ मोहिमेतून परतले, तेव्हा त्यांनी देशातील इस्रोच्या सर्व केंद्रांना भेट दिली होती. मी त्यावेळी अहमदाबाद येथील केंद्रात होतो. आम्ही एक उपग्रह बनविले होते, जे हजार किलोचे वजन अवकाशात घेऊन जाऊ शकत होते. त्यावेळी शर्मा म्हणाले, “मग तर मी ही यातून जाऊ शकतो.’ त्यावर, मी त्यांना सांगितले की “आम्ही तुम्हाला पाठवू तर शकतो, मात्र परत आणू शकणार नाही. आज त्या घटनेच्या इतक्‍या वर्षानंतर इस्रोने अवकाशातून परतीचे तंत्रज्ञान अवगत केले आहे आणि त्यामुळेच भारत आपल्या पहिल्या अंतराळ मोहिमेसाठी सज्ज होत आहे,’ असा विश्‍वास इस्रोचे माजी संचालक ज्येष्ठ अंतराळ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नाईक यांनी येथे व्यक्त केला.

साईनाथ मित्रमंडळा ट्रस्टतर्फे साईभंडारा आणि रामनवमी उत्सवांतर्गत आयोजित कार्यक्रमात डॉ. नाईक यांना “साई’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, शास्त्रज्ञ अरविंद नातू, संस्थेचे पीयूष शहा उपस्थित होते. डॉ. नाईक म्हणाले, “एकीकडे इस्रो उच्च तंत्रद्यान विकसित करत होता, तर दुसरीकडे त्या तंत्रज्ञानाच्या टेस्टिंगसाठी आपल्याकडे सुविधा नव्हत्या, अशा कठीण परिस्थितीत इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी काम केले आहे. आज विविध अंतराळ मोहिमा यशस्वीपणे पार पाडत यशाची नेत्रदीपक शिखरे पादाक्रांत केली आहेत. यापुढेही ही वाटचाल कायम राहणार आहे.

आगामे काळात चांद्रयान-2, आदित्य-1, गगनयान यासांरख्या महत्वपूर्ण मोहिमांवर इस्रो काम करत आहे. इतर मोहिमांप्रमाणे याही मोहिमांत इस्रो यशस्वी होईल आणि लवकरच आपले गगननॉटस अंतराळमोहिमेसाठी सज्ज होतील, असा विश्‍वास मला आहे.’ डॉ. करमळकर म्हणाले, “अतिशय खडतर काळातून प्रवास करून यश मिळविण्यापर्यंतचा एक मोठा टप्पा इस्रोच्या संशोधकांनी पार केला आहे. आज भारताकडे सर्वात स्वस्त सॅटेलाइट लॉचिंग पॅड म्हणून पाहिले जाते. याचे सर्व श्रेय इस्रोमध्ये काम करणाऱ्या डॉ. नाईक यांच्यासारख्या शास्त्रज्ञांना जाते. अशा व्यक्तीचा आज होणारा हा सन्मान खरोखरच अभिमानाचा क्षण आहे.’

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.